मॉस्को/किव्ह - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ५६वा दिवस आहे. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील क्रेमिन्ना शहरावर कब्जा केला आहे. येथून युक्रेनी सैन्याने येथून माघार घेतली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गव्हर्नरनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशियाकडून नव्याने आक्रमण सुरू करण्यात आल्यानंतर क्रेमिन्ना हे रशियाच्या ताब्यात आलेले पहिले शहर ठरले आहे. युद्धापूर्वी या शहराची लोकसंख्या ही १८ हजारांपेक्षा अधिक होती.
क्रेमिन्नावरील कब्ज्यामुळे रशियन सैन्य युक्रेनमधील एक मोठे शहर असलेल्या क्रामाटोर्स्कच्या जवळ पोहोचले आहे. हे शहर डोनबास क्षेत्रातील रशियाच्या संभाव्य लक्ष्यापैकी एक आहे, डोनबास आणि दक्षिणेतील प्रमुख बंदर असलेल्या मारियुपोलवर कब्जा केल्याने रशियाला पूर्व युक्रेनमधील नियंत्रित क्षेत्र आणि क्रिमियादरम्यान, जमिनी क्षेत्रातून संपर्क प्रस्थापित करण्यामध्ये यश मिळणार आहे. क्रिमियावर रशियाने २०१४ मध्ये कब्जा केला होता.
दरम्यान, एकीकडे रशियाने युक्रेनमधील एका शहरावर कब्जा केला असतानाच दुसरीकडे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावरील हल्ल्यानंतरही रशियन सैन्याला विशेष यश मिळाले नसल्याचा दावा केला आहे. रशियन सैन्याला भौगोलिक, रसद पुरवठा आणि तांत्रिक आव्हानांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.