प्राग – रशिया-यूक्रेन यांच्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशियानं यूक्रेनवर सातत्याने हल्ला सुरू ठेवला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियाच्या आण्विक प्रतिबंधक तुकड्या (Nuclear Deterrence Force) अलर्ट मोडवर आहेत. मागील काही दशकांपासून असं कधी घडलं नाही. ज्यात एका देशाने उघडपणे आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. परंतु यूक्रेनवर हल्ल्या केल्यानंतर पुतिन यांनी हे बोलून दाखवलं आहे.
रशिया-यूक्रेन युद्धाचं अणुयुद्धात रुपांतर होऊ शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. त्यामुळे यूरोपात दहशत पसरल्याचं बोललं जात आहे. न्यूज एजेन्सी रॉयटर्सच्या प्रमाणे, पुतिन यांच्या धमकीनंतर विशेषत: मध्य युरोपात चिंतेची लाट आहे. त्याच वेळी, पोलँडपासून बेलारूस आणि पूर्व सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तयार झालेल्या स्वतंत्र देशांपर्यंत या लढाईची भीती आहे. अणुहल्ल्याच्या भीतीने लोकं आयोडीनच्या(Iodine) गोळ्या विकत घेण्यासाठी धावत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, जर अणुहल्ला झाला तर हे आयोडीन त्यांना किरणोत्सर्गापासून वाचवेल. त्यामुळेच आयोडीनच्या गोळ्या ते सिरपची मागणी एवढी वाढली आहे की, युरोपातील अनेक देशांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
काही देशांमध्ये स्टॉक संपला
दरम्यान, फार्मसी युनियनचे अध्यक्ष निकोले कोस्तोव यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा दिवसांत, बल्गेरियाच्या फार्मसीने इतके आयोडीन विकले आहे जितके ते एका वर्षातही विकले गेले नव्हते. अनेक फार्मसीत आधीच संपलेल्या आहेत. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही नवीन मालाची ऑर्डर दिली आहे. पण मला भीती वाटते की तो साठाही लवकरच संपेल. लोक ते साठवून ठेवतात. तसेच लोक ते विकत घेण्यासाठी वेडे होत आहेत हे थोडे विचित्र वाटते. त्यामुळेच त्याची मागणी सातत्याने वाढत असल्याचं चेक रिपब्लिकमध्ये डॉ मॅक्स फार्मसीचे प्रतिनिधी मिरोस्लावा स्टॅनकोवांनी सांगितले.
अधिकाऱ्यांचा सल्ला
आयोडीन गोळ्या किंवा सिरपच्या स्वरूपात घेतले जाते. किरणोत्सर्गाच्या (रेडिओअॅक्टिव्ह एक्सपोजर) धोक्यात, थायरॉईड आणि कर्करोगासारख्या आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण करण्याचा हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. २०११ मध्ये, जपानी अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती की, खराब झालेल्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी आयोडीन घ्यावे. त्यामुळेच मागील घटनांचा आढावा घेऊन अनेक देशांमध्ये साठा संपला आहे.