रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध अद्यापही थांबताना दिसत नाही. युक्रेन सातत्याने शांतता करारावर जोर देत आहे. यातच, युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी पत्रकारांसोबत बोलताना, पुढील शांतता कराराच्या बैठकीसाठी भारत एक चांगले ठिकाण असू शकते, असे म्हटले आहे. गेल्यावेळी, स्वित्झर्लंडमध्ये शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. युक्रेनला आशा आहे की, या बैठकीच्या माध्यमाने फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेले युद्ध थांबेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय युक्रेन दौरा पूर्णकरून भारतात परतल्यानंतर झेलेन्स्की यांनी हे विधान केले आहे. मोदी पोलंड वरून ट्रेनने कीवला पोहोचले होते. येथे त्यांनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी, दोन्ही देशांनी एकत्रितपणे या संघर्षावरील समाधान शोधावे, अशी आपली इच्छा असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी चर्चेवर अधिक भर दिला होता.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी जारी केलेला प्रस्ताव अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. जरही बैठ झाली आणि युद्ध थांबवण्यावर सहमती झाली तर हा भारताचा कूटनीतिक विजय असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताची या प्रस्तावावर नजर आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यासाठी किती सहमत होती, याकडे सर्वांचे लक्ष आहे.