Narendra Modi Joe Biden : "भारत आपले निर्णय स्वत:च घेईल, परंतु...;" मोदी-बायडेन चर्चेनंतर अमेरिकेचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:27 PM2022-04-12T15:27:05+5:302022-04-12T15:27:57+5:30
Narendra Modi Joe Biden : आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं असंही मोदींनी यादरम्यान सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी सोमवारी आभासी शिखर परिषदेत रशिया युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) चर्चा केली. या संकटावर भारत आपला निर्णय स्वत:च घेईल असं अमेरिकनं म्हटलं. दरम्यान, भारतानं रशिया आणि चीनमधील वाढते संबंध पाहिलेज तर स्पष्टपणे त्यांचे विचार प्रभावित होतील, असंदेखील अमेरिकेनं म्हटलं. दरम्यान, आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की (Ukraine Volodymyr Zelensky) यांना थेट चर्चेबद्दल सुचवलं होतं, असंही पंतप्रधान मोदींनी यादरम्यान सांगितलं.
चर्चेदरम्यान युक्रेनमधील बुचा येथे झालेल्या नरसंहाराबाबत पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. "बुचा शहरात निर्दोष नागरिकांची झालेली हत्या चिंताजनक होती. आम्ही याची निंदा केली आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली. आम्ही युक्रेनमधील लोकांच्या संरक्षणावर आणि त्यांना मानवतावादी मदतीचा अखंड पुरवठा करण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मी वॉशिंग्टनला आलो होतो, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की भारत-अमेरिका भागीदारी अनेक जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी हातभार लावू शकते," अशी आठवणही त्यांनी यावेळी काढली.
"भारतावर दबाव टाकला का?"
"मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या लोकशाहीच्या रुपात आपण स्वाभाविकच भागीदार आहोत," असं मोदी म्हणाले. यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत भारतावर एका बाजूनं निर्णय घेण्यास दबाव टाकला का? असा प्रश्न विचारण्यात आला. "भारत आपले निर्णय स्वत: घेईल. परंतु चर्चा कायम सुरू राहील," असं उत्तर देताना बायडेन म्हणाले.
"आम्हाला माहितीये की भारताला रशिया आणि चीन यांच्यातील संबंधांची चिंता आहे. भारत नियंत्रण रेषेवर अतिशय तणावपूर्ण स्थितीचा सामना करत आहे. हे भारताच्या विचारांना प्रभावित करणारा आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.