Russia-Ukraine War: “रशियाने युक्रेनवरील हल्ल्याबाबत भारताने नरमाईची भूमिका घेतली, पण...”; अमेरिकेचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:52 AM2022-03-22T08:52:12+5:302022-03-22T08:53:00+5:30
Russia-Ukraine War: रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेवर जो बायडन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वॉशिंग्टन: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा २२ वा दिवस आहे. युक्रेनच्या विविध भागांवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता अमेरिका यात उडी घेण्याच्या तयारीत असल्यामुळे तिसरे महायुद्ध होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशातच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांबाबत भारताने तटस्थ भूमिका घेतली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताच्या या भूमिकेवरून पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक देशांनी आर्थिकसह विविध प्रकारचे निर्बंध लादले. अनेक देशांनी याविरोधात संयुक्त राष्ट्रात भूमिका घेतली. तर चीनसह काही देशांनी रशियाला पाठिंबा दिला. रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेवर जो बायडन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रशियावर निर्बंध लावण्यास भारताने नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र, इतर देशांनी कठोर भूमिका घेत रशियावर निर्बंध लादले. क्वाड देशांपैकी भारत सोडल्यास जापानने रशियाविरोधी कठोर पावले उचलली, असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारताला पाठिंबा
युक्रेनसंदर्भातील भारताच्या भूमिकेला ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला आहे. मात्र, रशियासंदर्भात बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने कठोर भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, मारियुपोलमध्ये युक्रेनच्या सैनिकांनी रशियाला शरण येण्यास नकार दिला असून, यापुढेही लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या युद्धाच्या २६व्या दिवशी रशियाने कीव्ह, मारियुपोल आदी शहरांवर आणखी तीव्र हल्ले चढवले. मारियुपोलमध्ये युक्रेनचे सैनिक शरण आल्यास त्यांना सुरक्षितपणे शहराच्या बाहेर जाऊ देण्यात येईल, असा रशियाने मांडलेला प्रस्ताव युक्रेनने धुडकावून लावला.
दरम्यान, रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये मारियुपोल शहराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो लोकांचा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. त्या देशातील अझोव्ह या शहरात एका शाळेच्या इमारतीमध्ये ४०० नागरिकांनी आश्रय घेतला आहे. त्या शाळेवरही बॉम्बचा मारा करण्यात आला. या हल्ल्याचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी तीव्र निषेध केला आहे.