Russia Ukraine War: अमेरिकेला आता इतिहासाचे पुस्तक आठवले; तेव्हा द्वेश, आता रशियावरून भारताला 'धडे' द्यायचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:37 AM2022-03-16T08:37:43+5:302022-03-16T08:38:32+5:30
Russia Ukraine War, America: बांग्लादेशला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकिस्तानशी युद्ध छेडले होते. प्रसंग बाका होता. अमेरिकेने जपानमध्ये तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्यांचा ताफा भारताच्या दिशेने पाठविला होता. भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे आदेश अमेरिकेने दिले होते.
पाकिस्तानच्या जोखडातून बांग्लादेशला सोडविताना भारतावर एकेकाळी हल्ला करण्याचा आदेश देणाऱ्या अमेरिकेला आता इतिहासाचे पुस्तक आठवू लागले आहे. रशियाच्या बाजुने उभे ठाकलेल्या भारताला अमेरिका इतिहासाच्या पुस्तकाचे दाखले देऊ लागला आहे.
बांग्लादेशला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकिस्तानशी युद्ध छेडले होते. प्रसंग बाका होता. अमेरिकेने जपानमध्ये तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्यांचा ताफा भारताच्या दिशेने पाठविला होता. भारतावर हल्ला करण्याचा अमेरिकेचे आदेश होते हे नंतर उघड झाले. भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे आदेश अमेरिकेने दिले होते.
आज रशियावरून हाच भारतद्वेष्टा अमेरिका भारताला धडे शिकवू लागला आहे. एका पत्रकाराने व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी यांना भारत रशियाने कमी दरात ऑफर केलेले क्रूड ऑईल विकत घेईल का, असे झाल्यास काय कारवाई होईल असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्या महिला सेक्रेटरीने या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, जेव्हा या घटनेवर इतिहासाची पुस्तके लिहिली जातील, तेव्हा तुम्ही कुठे उभे असावे याचा विचार करायला हवा. रशियाच्या नेतृत्वाचे समर्थन म्हणजे विनाशकारी आक्रमणाचे समर्थन आहे, अशा शब्दांत अमेरिकेने भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे.
काय घडलेले तेव्हा... हा इतिहास कसा विसरायचा...
अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली पीएनएस गाझी ही पाणबुडी भारताची जुनी परंतू भक्कम युद्धनौका आयएनएस विक्रांत बुडविण्यासाठी बंगालच्या उपसागरात आली होती. अशावेळी रशियाने मोठा निर्णय घेतला आणि जग काय म्हणेल याची चिंता न करत बसता भारताच्या मदतीला धावून आला होता. पाकिस्तानशी युद्ध अंतिम टप्प्यात आले होते. यावेळी अमेरिकेने पाकिस्तान हरत असल्याचे पाहून भारतावर हल्ला करण्यासाठी मोठा ताफा पाठविला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या आदेशावरून जपानच्या तळावर तैनात असलेल्या युद्धनौकांचा सातवा ताफा भारताकडे कूच करत होता.
#WATCH | Think where you want to stand when history books are written in this moment in time. Support for Russian leadership is support for invasion having devastating impact: WH Press Secy on report about possibility that India could take up Russian offer of discounted crude oil pic.twitter.com/KgutHoUlVM
— ANI (@ANI) March 16, 2022
जपानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सातव्या ताफ्यात युएसएस एंटरप्राईस नावाची एक तेव्हाची सर्वात खतरनाक युद्धनौका होती, जिच्यावर अण्वस्त्रवाहू विमाने तैनात होती. याचबरोबर अन्य युद्धनौका होत्या. हा ताफा एवढा शक्तीशाली होता की एकदा इंधन भरले की जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर न थांबता जाऊ शकत होता. बंगालच्या सागरात एकटी विक्रांत पीएनएस गाझीशी लढत होती. अत्यंत चपळाईने या युद्धनौकेने गाझीला समुद्राच्या तळाशी पाठविले. इथेच पाकिस्तान आणि अमेरिकेची पहिली हार झाली होती. अत्यंत अद्ययावत आणि खतरनाक असलेली पाणबुडी भारताने बुडविली होती.
अमेरिकेचा भारताकडे येत असलेला युद्धनौकांचा ताफा विक्रांतच्या तुलनेत कित्येक पटींनी शक्तीशाली होता. अमेरिकेने या पावलामागे बांगलादेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कारण जरी दिले असले तरी त्यामागचे इप्सित वेगळेच होते, जे कदापीही पूर्ण झाले नाही. अमेरिकेविरोधात भारताचा कसा निभाव लागेल, या चिंतेत रशिया पडला होता. योगायोग म्हणजे तेव्हाच भारत आणि रशियामध्ये मैत्री आणि सहकार्य करार झाला होता. रशियाला अमेरिकेच्या या पावलाची भनक लागताच मॉस्कोने तात्काळ निर्णय घेतला.
भारतावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने नौसेनेच्या तीन बटालियनना हल्ल्याच्या तयारीचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस एंटरप्राईजला भारतीय शहरांवर हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही पुरविण्यात येत होती. रशियाने तातडीने युएनकडे मदत मागितली. तिकडून काही प्रतिसाद येण्याची वाट न बघता रशियाने मोठा निर्णय घेतला होता. प्रशांत महासागरात तैनात असलेला युद्धानौका आणि पाणबुड्यांच्या ताफ्याला तातडीने, शक्य तेवढ्या लवकर हिंदी महासागरात जाण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिका याबाबत अनभिज्ञ होता. पाकिस्तानही अमेरिकेच्या जहाजांची वाट पाहत होता. तोवर त्यांनी शरणागती पत्करण्यासाठी वेळकाढू पणा चालविला होता. रशियाच्या युद्धनौकांनी तेवढ्यातच अमेरिकेच्या युद्धनौकांचा पाठलाग सुरु केला. जोपर्यंत त्या भारतापासून दूर जात नाहीत तोवर त्यांच्या मागावर राहिले.