वॉशिंग्टन: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. युक्रेनच्या विविध भागांवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशात आणण्यात आले आहे. मात्र, अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता नाटो देशांनी रशियाशी लढण्यास सुरुवात केली, तर तिसरे महायुद्ध सुरू होईल, असा सूचक इशारा अमेरिकेने दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर बोलताना पुन्हा एकदा रशियाला इशारा दिला आहे. रशियाने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. अमेरिका युक्रेनमध्ये जाऊन रशियाशी लढणार नाही. मात्र, नाटो आणि क्रेमलिन यांच्यात थेट लढाई झाली, तर तिसरे महायुद्ध गतिमान होईल, असा दावा करत रशिया कधीही युक्रेन जिंकू शकत नाही, असे बायडन यांनी म्हटले आहे.
तिसरे महायुद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करू
युरोपातील सहकारी देशांसोबत आम्ही ठामपणे उभे राहू. नाटो देशाच्या एक एक इंच जमिनीच्या रक्षणासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तसेच अन्य देशांना त्यासाठी प्रेरित करू. नाटो देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध अटळ होईल. मात्र, तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बायडन यांनी स्पष्ट केले. उत्तर अटलांटिक संधी संघटन म्हणजेच नाटो हा ३० उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांचा एक समूह आहे. याचा उद्देश राजकीय आणि सैन्य साधनांच्या माध्यमातून आपल्या सदस्य देशांचे स्वातंत्र्य आणि संरक्षणाची हमी देणे असा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर जगातील विविध देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर बंदी आणण्यात आली. अनेक बड्या कंपन्यांनी आपली उत्पादन रशियात विक्री करणार नसल्याचे सांगितले आहे. एकूणच या कृतीमुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे, जागतिक बँकेने युक्रेनसाठी ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचे कर्ज आणि अनुदानाचे पॅकेज मंजूर केले आहे.