कीव: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात (Russia-Ukraine Crisis) रशियाच्या हल्ल्यात अमेरिकेतील पत्रकार आणि डॉक्युमेंट्री फिल्म मेकर ब्रेंट (Brent Renaud) रेनॉडचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्रेंट यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. ब्रेंट रेनॉड एक हुशार पत्रकार, चित्रपट निर्माता आणि फोटो जर्नलिस्ट होते. ब्रेंट यांनी त्यांचा भाऊ क्रेगसोबत मिळून एचबीओ आणि वाइस न्यूजसाठी अनेक माहितीपटांची निर्मिती केली आहे.
2009 मध्ये ब्रेंटने त्याच्या भावासोबत 'वॉरियर चॅम्पियन्स: फ्रॉम बगदाद टू बीजिंग' (Warrior Champions: From Baghdad to Beijing) हा माहितीपट बनवला होता. रिपोर्ट्सनुसार ब्रेंट न्यूयॉर्क टाइम्ससाठी काम करत होते. 13 मार्च 2022 युक्रेनच्या निर्वासितांवर एक रिपोर्ट तयार करण्यासाठी ब्रेंट आले होते, यादरम्यान, रशियाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
स्वतःच्या जबाबदारीवर युक्रेनमध्ये आले होते 50 वर्षीय ब्रेंट रेनॉड आर्कान्सासमचे रहिवासी होते. ब्रेंट अतिशय हट्टी स्वभावाचे होते, म्हणूनच ते स्वतःच्या जबाबदारीवर युक्रेनला आले होते. त्यांना ते काम करत असलेल्या कंपनीने युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता, पण हट्टी ब्रेंटने निर्वासितांवर विशेष अहवाल बनवण्यासाठी युक्रेनमध्ये येण्याचे ठरवले. दरम्यान, ब्रेंट यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
असा झाला ब्रेंट यांचा मृत्यू?गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. सैनिकांपासून सर्वसामान्यांपर्यंत मारले गेले आहेत. ब्रेंट रेनॉड युक्रेनियन निर्वासितांचे चित्रीकरण करत होते. रविवारी युक्रेनमधील इरपिनमध्ये रशियन लष्कराने गोळीबार केला होता, त्यादरम्यान ब्रेंटच्याही मृत्यूची बातमी समोर आली होती. ब्रेंट यांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार झाला, यात ब्रेंटचा मृत्यू झाला तर पत्रकार जुआन अरेडोंडो (Juan Arredondo) गंभीर जखमी झाले.