Russia Ukraine War: भारत कुणासोबत? रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया, बायडन म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 01:16 PM2022-02-25T13:16:32+5:302022-02-25T13:17:53+5:30
Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे.
Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनला आहे. भारतानं आतापर्यंत याप्रकरणात आपली नि:पक्ष भूमिका कायम ठेवली आहे. एका बाजूला बहुतांश देश रशियाच्या भूमिकेची निंदा करत असताना भारतानं रशियाच्या आक्रमणाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचवेळी अमेरिकेतही आता भारत नेमका कुणाच्या बाजूनं आहे असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बायडन यांनी रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत अमेरिका भारताशी चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, युक्रेनवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जो बायडन यांना भारत रशियाच्या विरोधात अमेरिकेसोबत आहे का? असा प्रश्न विचारला. "आम्ही भारतासोबत युक्रेन संकटाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. याप्रकरणावर अद्याप कोणत्याही पद्धतीचा तोडगा निघालेला नाही", असं जो बायडन म्हणाले.
अमेरिकेचा राष्ट्रपती विभाग, परराष्ट्र विभाग आणि अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा परिषद अशा विविध पातळ्यांवर बायडन प्रशासन युक्रेन संकटावर भारताकडून पाठिंब्याची मागणी करत आहे. तसंच विविध स्तरांवर भारतीय समिक्षकांशी याबाबत चर्चा केली जात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी युक्रेनच्या संकटाबाबत चर्चा केली. रशियाच्या हल्ल्याची निंदा, रशियन सैन्यानं तात्काळ घरवापसी आणि युद्धविरामाचा आवाहन करण्यासाठी एक मजबूत सामूहिक प्रतिक्रिया देण्याची गरज असल्याचं ब्लिंकन यांनी जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे.
Appreciate the call from @SecBlinken.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 24, 2022
Discussed the ongoing developments in Ukraine and its implications.
ब्लिंकन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर एस.जयशंकर यांनी एक ट्विट देखील केलं आहे. युक्रेन संकटावर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.