रशिया-युक्रेन युद्ध: बाखमुत पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 09:52 AM2023-06-04T09:52:31+5:302023-06-04T09:53:19+5:30
बाखमुतवर विजय मिळविणे हा रशियासाठी युक्रेन युद्धातला एक टप्पा आहे. रशियाला संपूर्ण युक्रेनच टाचेखाली आणायचा आहे.
समीर परांजपे, मुख्य उपसंपादक
गेल्यावर्षी सुरू झालेल्या युक्रेन युद्धाचा अंत कधी होणार, याची कोणालाच कल्पना नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच युक्रेनचा पराभव करू, अशी तेव्हा रशियाने केलेली घोषणा वल्गना ठरली होती. बाखमुतमध्ये युक्रेनच्या सैन्याचा पराभव केल्याचा रशियाने नुकताच दावा केला. बाखमुतमध्ये रशियातील खासगी लष्कर वॅगनरचे सैनिक लढत आहेत. या शहराचा ताबा लवकरच रशियाच्या लष्कराला देणार असल्याचे वॅगनरने जाहीर केले आहे.
रशियाने गेल्या वर्षी मे महिन्यापासून बाखमुतवर जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली होती. या शहरावर कब्जा करून रशियाला काही फायदे होतील. बाखमुत रशियाच्या हाती आल्यानंतर युक्रेनच्या रसदीमध्ये मोठे अडथळे निर्माण होतील; तसेच युक्रेनचे डोनेस्क प्रांतातील क्रॅमतोर्स्क व स्लोव्हियान्स्क हे दोन बालेकिल्ले सर करणे रशियासाठी सोपे होईल. बाखमूतमध्ये वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षात हे शहर उद्ध्वस्त झाले.
बाखमुतमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठागरे आणि जिप्समच्या खाणी आहेत. त्या साठ्यांवर कब्जा करण्यासाठी रशिया टपला आहे; मात्र केवळ या साठ्यांसाठी रशियाने बाखमुतवर आक्रमण केलेले नाही. रशिया व युक्रेनमध्ये २०१४ साली देखील असाच संघर्ष उद्भवला होता. तेव्हा रशियाने क्रिमियाचा घास गिळला व तो देश काही वर्षे शांत बसला. मुळात युक्रेनचे जगाच्या नकाशावरील स्वतंत्र अस्तित्व रशियाच्या डोळ्यांत खुपते आहे. १९८९ साली सोव्हिएत संघराज्याचे विघटन झाले. त्यातून अनेक देश निर्माण झाले. मुळात विघटनाची घटना पुतीन यांच्यासारख्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या लोकांना जिव्हारी लागली होती. रशियाला त्याचे पूर्वीचे वैभव व प्रदेश मिळवून देण्याची इच्छा पुतीन यांच्या मनात आहे. त्यानुसारच त्यांनी युक्रेनचे युद्ध सुरू केले. त्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमुतमध्ये युक्रेनच्या सैनिकांशी रशियाचे लष्कर व वॅगनर हे खासगी सैन्य झुंजत आहे.
युक्रेनच्या पूर्व भागात असलेले बाखमुत शहर चारशे वर्षे जुने आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून तिथे चाललेल्या संघर्षात काही हजार नागरिक ठार झाले. तेथील लोकसंख्येपैकी सुमारे ९० टक्के लोकांनी जीव वाचविण्यासाठी युक्रेनच्या अन्य भागांमध्ये पलायन केले. काही महिन्यांपूर्वी दिमाखात उभे असलेले बाखमुत आता बेचिराख झाले आहे.
बाखमुतवर विजय मिळविणे हा रशियासाठी युक्रेन युद्धातला एक टप्पा आहे. रशियाला युक्रेन पूर्णपणे आपल्या टाचेखाली आणायचा आहे. त्यादृष्टीने हे युद्ध पुतीन टप्प्याटप्प्याने लढत आहेत. जागतिक दडपणामुळे या युद्धात रशिया अण्वस्त्रांचा वापर करणे शक्यतो टाळत आहे. युक्रेनला अमेरिका, युरोपीय देश आर्थिक; तसेच संरक्षणविषयक मदत करीत आहेत. युक्रेनकडे जगातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आली तर हा देश रशियाच्या लष्कराचा अधिक समर्थपणे मुकाबला करू शकेल; पण शेवटी मदत ही मदत असते. युक्रेन हा रशियाशी लष्करीदृष्ट्या कोणत्याच बाबतीत तुल्यबळ ठरू शकत नाही. त्यामुळे या युद्धात युक्रेनला भावी काळात आपला आणखी मोठा प्रदेश गमवावा लागणार, हे अटळ आहे. बाखमुतमध्ये सुमारे एक लाख माणसे राहत होती; पण आता तिथे स्मशानशांतता आहे. बाखमुतच्या भग्नावशेषांत युक्रेनला आपला भावी काळ दिसत असेल का?