रशियाने युक्रेनवर एवढा भीषण हल्ला का केला याची कारणे वेगवेगळी असली तरी आता एक मोठी माहिती हाती येत आहे. युक्रेनचे फरार माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर फेडोरोविच यानुकोविचला युक्रेनचा पुन्हा राष्ट्राध्यक्ष करण्याचा रशियाने आखल्याचे समोर येत आहे. व्हिक्टर यांना २०१४ मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे पायऊतार व्हावे लागले होते. त्यांना देश सोडून रशियात शरण घ्यावी लागली. व्हिक्टर सध्या रशियाच्या मिन्स्कमध्ये लपलेले आहेत.
व्हिक्टर हे २००२ ते २००७ य़ा काळात युक्रेनचे पंतप्रधान होते. त्यानंतर २०१० मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले. २०१४ मध्ये त्यांना हटविण्यात आले. रशियाने युक्रेनसोबत चर्चा सुरु ठेवण्याची संमती दिली आहे. पोलंडमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात थोड्याच वेळाच चर्चा सुरु होणार आहे. परंतू अद्याप युक्रेनचे शिष्टमंडळ तिथे पोहोचलेले नाही.
याच्या आधीच युक्रेनच्या मीडियाने मोठी खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना हटवून व्हिक्टर फेडोरोविच यानुकोविच यांना त्यांच्याजागी बसवायचा रशियाचा प्लॅन असल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनच्या गुप्तपर यंत्रणांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. रशिया जेलेन्स्की यांची हकालपट्टी करून व्हिक्टर यांच्या नावाची राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषणा करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी व्हिक्टर फेडोरोविच यानुकोविचला एका खास मोहिमेसाठी तयार केले जात आहे.
रशियाला युक्रेनने शरणागती पत्करलेली हवी आहे. यासाठी युक्रेनला नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू युक्रेन चिवट झुंज देत असल्याने त्यांचा हा प्लॅन सफल होत नाहीय.
नेमके काय घडलेले २०१४ मध्ये....
नोव्हेंबर 2013 मध्ये, लिथुआनियामधील विल्नियस येथे बैठकीत तत्कालीन अध्यक्ष व्हिक्टर फेडोरोविच यानुकोविच यांनी युरोपियन युनियन (EU) सोबत राजकीय संघटना आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात निषेधाची लाट उफाळून आली. अनेक महिने हे आंदोलन सुरू राहिले. फेब्रुवारी 2014 मध्ये, आंदोलक आणि बेरकुट (विशेष दंगलप्रतिरोधक पोलिस) यांच्यातील संघर्ष हिंसक बनला आणि 18 पोलिस अधिकार्यांसह सुमारे 130 लोकांचा मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी, अध्यक्ष यानुकोविच आणि संसदेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये एक करारावर स्वाक्षरी करण्यात आली ज्यामध्ये लवकर निवडणुका घेणे आणि अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी कीव आंदोलकांच्या ताब्यात आले आणि यानुकोविच यांनी देश सोडून पलायन केले. त्याच दिवशी यानुकोविच यांना हटविण्यासाठी संसदेत मतदान घेण्यात आले. यामध्ये यानुकोविच यांच्याविरोधात ३२८-० असे मतदान झाले.
तेव्हा यानुकोविच यांनी रशियाकडे मदत मागितली. तेव्हा रशियानेही युक्रेनचे सरकार बेकायदेशीर मानले व नव्या सरकारला मान्यता दिली नाही. तसेच यानुकोविच यांना देखील रशियात शरण दिली. यानंतर रशियाने २०१४ मध्ये युक्रेनचे दोन तुकडे केले.