Russia Ukraine War: मोठा दावा! झेलेन्स्की रशियन फौजांच्या ताब्यात येता येता राहिले; युद्ध पहिल्याच दिवशी संपले असते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 03:56 PM2022-04-30T15:56:40+5:302022-04-30T15:56:58+5:30
Russia Ukraine War: झेलेन्स्कींचे कार्यालय हे सुरक्षित ठिकाण नाही, हे त्यामुळे समोर आले. रशियाने त्यांचे कमांडो पॅरॅशूटद्वारे कीव्हमध्ये उतरविले होते. त्यांना झेलेन्स्की आणि त्यांच्या फॅमिलीला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश होते, युक्रेनी लष्कराचा संदेश आल्यावर प्रेसिंडेंट हाऊससमोर चकमक सुरु झाली.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्या त्याला आता ६६ दिवस लोटले आहेत. पुतीन सेनेला युक्रेनचा बराचसा भाग जिंकता आला असला तरी अद्याप युक्रेन काही पडलेले नाही. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या अत्यंत निकटच्या अधिकाऱ्याने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. तेव्हा रशियन फौजा खूप आतपर्यंत घुसल्या होत्या. काही रशियन सैनिक तर कीव्हमध्येही आले होते. झेलेन्स्की आणि त्यांच्या कुटुंबाला पकडण्याचा त्यांचा इरादा होता. झेलेन्स्कींच्या कार्यालयात गोळीबाराचे आवाजही ऐकू आले. तेवढ्यात झेलेन्स्की तिथून निसटले, रशियन सैनिक आणि झेलेन्स्की यांच्यात काही मिनिटांचे अंतर होते, क्षणात झेलेन्स्की रशियाच्या ताब्यात गेले असते, असा दावा चिफ ऑफ स्टाफ अँड्री येरमाक यांनी केला आहे.
इनसाईड झेलेन्स्की वर्ल्ड या टाईम्सने छापलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. झेलेन्स्कींचे कार्यालय हे सुरक्षित ठिकाण नाही, हे त्यामुळे समोर आले. रशियाने त्यांचे कमांडो पॅरॅशूटद्वारे कीव्हमध्ये उतरविले होते. त्यांना झेलेन्स्की आणि त्यांच्या फॅमिलीला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश होते, युक्रेनी लष्कराचा संदेश आल्यावर प्रेसिंडेंट हाऊससमोर चकमक सुरु झाली. झेलेन्स्की आतच होते. सुरक्षा रक्षकांनी जे हाती मिळेल त्याने कुंपण सील करण्याचा प्रयत्न केला. तातडीने बुलेटप्रूफ जॅकेट, रायफली आणि अन्य शस्त्रांची सोय केली गेली. मात्र, तेथे उपस्थित अनेकांना ही शस्त्रे कशी चालवायची याची माहिती नव्हती, असा दावा येरमाक यांनी केला. तेथून कसेबसे झेलेन्स्की आणि त्यांचे कुटुंबीय निसटल्याचे येरमाक म्हणाले.