मॉस्को: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा २२ वा दिवस आहे. युक्रेनच्या विविध भागांवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे सल्लागार एनतोली चुबाइस (Anatoly Chubais) यांनी राजीनामा दिला आहे. रशियासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
युक्रेनवर आक्रमण केल्याने नाराज असलेल्या रशियन दूत तसेच पुतिन यांचे सल्लागार चुबाइस यांनी पायउतार होत देश सोडला आहे. पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने चुबाइस नाराज असल्याचे या घडामोडीशी संबंधित दोघांनी सांगितलं आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देश सोडल्याने रशियासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.
चुबाइस १९९० च्या दशकातील आर्थिक सुधारकांपैकी एक
चुबाइस हे रशियातील खासगीकरणाच्या धोरणाचे शिल्पकार समजले जातात. चुबाइस यांच्या मार्गदर्शनात पुतीन यांनी काम केले आहे. १९९० च्या दशकाच्या अखेरपर्यंत पुतीन यांनी त्यांचा प्रभाव वाढवला आणि रशियन सत्ताकारण प्रवेश केला. त्यावेळीही चुबाइस यांची भूमिका महत्त्वाची होती. ६६ वर्षीय असलेले चुबाइस हे १९९० च्या दशकातील काही आर्थिक सुधारकांपैकी एक असून पुतीन यांच्या सरकारमध्ये राहिले होते. त्यांनी पाश्चात्य देशांसोबत चांगले संबंध ठेवले होते. क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
अंधकारमय दृष्टिकोनाचा इशारा
चुबाइस यांनी सहकारी आणि मित्रांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपण पदावरुन पायउतार होत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी अंधकारमय दृष्टिकोनाचा इशारा दिला. सहकारी आर्थिक सुधारक माझ्यापेक्षा धोरणात्मक धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत होते आणि मी चुकीचा होतो असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. चुबाइस यांनी १९९० च्या काळात पुतिन यांना पहिली नोकरी दिली होती, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, रशियाच्या १९९० च्या दशकातील खासगीकरणाचे शिल्पकार म्हणूनही चुबाइस यांना ओळखले जाते. पुतीन सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकासासाठी दूत म्हणून नियुक्ती होईपर्यंत त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली.