युक्रेनमध्ये पुन्हा अग्नितांडव; रशियाने राजधानी कीवसह 3 शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:21 PM2022-12-16T18:21:36+5:302022-12-16T18:22:34+5:30
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध अजून थांबले नाही. यातच रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.
Russia Ukraine War: गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध अजून थांबलेलं नाही. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत असतो. आता पुन्हा एकदा रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यावेळी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तीन शहरांना लक्ष्य केले आहे. युक्रेनच्या ज्या तीन शहरांवर रशियाने क्षेपणास्त्रे डागली, त्यात कीव, दक्षिणी क्रिवी रिह आणि ईशान्य खार्किव यांचा समावेश आहे.
रशियाने युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हे क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला जातोय. रशियाने ऑक्टोबरपासून युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करणे सुरू केले आहे. खार्किवचे महापौर इहोर तेरेकोव्ह यांनी 'टेलिग्राम' या सोशल मीडिया अॅपवर सांगितले की, शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
तसेच, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी किरिलो टायमोशेन्को यांनी क्रिवी रिह येथील निवासी इमारतीवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी टेलिग्रामवर सांगितले की, लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे. आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल आहेत. कीवचे महापौर, विटाली क्लिट्स्को यांनी उत्तर-पूर्व डेस्नियान्स्की आणि पश्चिम होलोसिव्हस्की जिल्ह्यांमध्ये झालेल्या स्फोटांबद्दल सांगितले.