रशिया आणि युक्रेन यांच्यात साधारणपणे गेल्या आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, अद्याप कुणीही हार मानलेली नाही. पश्चिमेकडील देश युक्रेनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यामुळे पुतिन त्यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. यातच, रशियाने गुरुवारी ब्रिटनच्या राजदूताला बोलावून निषेध व्यक्त केला आहे.
महत्वाचे म्हणजे, क्रिमियामध्ये रशियाच्या ब्लॅक सी आरमारावर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात ब्रिटिश नौदलाचे जवान सहभागी होते, असा दावा मॉस्कोने केला आहे. राजदूत डेबोरा ब्रोनर्ट हे स्थानिक वेळेनुसार 10:30 (0730 GMT) वाजता परराषट्रमंत्रालयात पोहोचले. यावेळी काही लोकांनी ब्रिटन विरोधात घोषणा बाजीही केली. एवढेच नाही, तर त्यांनी 'ब्रिटन एक दहशतवादी देश आहे' सारख्या घोषणा लिहिलेले फलकही धरले होते.
30 मिनिटे मंत्रालयात होत्या राजदूत - ब्रोनर्ट जवळपास 30 मिनिटे मंत्रालयात होत्या. मात्र, यावर अद्याप रशिया अथवा ब्रिटनकडून कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाहीत. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता मारिया जखारोव्हा यांनी बुधवारीच, क्रिमियावरील शनिवारच्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात राजदूतांना बोलावण्यात येईल, असे म्हटले होते. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केले होते. मात्र, ब्रिटनने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय, ब्रिटन पश्चिमेकडील एक घातक शक्ती असल्याचे रशिया ने म्हटले आहे. एवढेच नाही, तर रशिया नष्ट करण्याचा आणि आपली विशाल नैसर्गिक संसाधने बळकवण्याचा ब्रिटनचा कट आहे, असे साष्ट्रपती पुतीन यांनी म्हटले आहे.