Ukraine-Russia Dispute: युक्रेनचे दोन भाग करून रशियाने अमेरिकेसह नाटोला शह दिला असून आपले सैन्यही युक्रेनमध्ये घुसविले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे पश्चिमी देशांमुळे करावे लागल्याचा आरोप केला आहे. या विरोधात ब्रिटनने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
रशियाने लुहान्स्क (Luhansk) आणि डोनेटस्क (Donetsk) ला स्वतंत्र घोषित करत युक्रेनचा लचका तोडला आहे. यावर आता जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, पुतीन यांनी आता भविष्यातील गोष्टींसाठी तयार रहावे. जर युद्ध झाले तर ब्रिटनचे ४४ दशलक्ष पुरुष, महिला आणि मुलांचे एकच लक्ष्य असेल ते म्हणजे युद्ध लढणे.
ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी रशियन सैन्याने प्रतिक्रिया दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसविण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडमधील लीसेस्टरशायर येथे मंगळवारी झालेल्या बाल्टिक आणि उत्तर अटलांटिक राज्यांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत वॉलेस यांनी इशारा दिला की, युद्ध सुरू झाल्यास रशियन सैन्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. युक्रेन हे एक सार्वभौम राज्य आहे, परंतु रशियाने ते जबरदस्तीने तोडले आहे.
दरम्यान, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी सांगितले की, जर्मनीने रशियासोबतचा नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइन प्रकल्प स्थगित केला आहे. ब्रिटनने रोस्सिया बँक, आयएस बँक, जनरल बँक, प्रोमस्वायाझ बँक आणि ब्लॅक सी बँकांना दिलेली मान्यता रद्द केली आहे. याचबरोबर रशियाचे अब्जाधीश उद्योगपती गेन्नेडी टिमचेंको, बोरिस रोटेनबर्ग आणि इगॉर रोटेनबर्ग यांच्या ब्रिटन आणि युकेतील एन्ट्रीवर बंदी आणली आहे.