नवी दिल्ली – सुपरपॉवर अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही रशियानं यूक्रेनवर हल्ला करत युद्धाची(Russia Ukraine War) घोषणा केली. मात्र त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. रशियानं यूक्रेनवर हल्ला केला तसं चीनही कुरापती करू शकतं असं बोललं जात आहे. अमेरिकेसह जगातील देशांनी रशियाने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे चीनचा उत्साह वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर LOC च्या आसपास कब्जा करण्याच्या नादात चीनचं सैन्य पूर्व लडाखमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा जगातील इतर देश उघडपणे मदतीला येणार नाहीत. अद्याप रशिया यूक्रेनचं युद्ध संपलं नाही. मात्र चीनची वृत्ती बदलताना दिसतेय. युरोपची अवस्था पाहता चीननं आशियात धमकावणं सुरू केले आहे. विशेष म्हणजे ही धमकी भारतात चीनचे राजदूत राहिलेले ली यूचेंग यांनी दिलीय. ज्यांना पुढील वर्षी चीनचं परराष्ट्र मंत्री बनवण्याची दाट शक्यता आहे.
मागील १ महिन्यापासून रशियाच्या लष्करानं यूक्रेनवर बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. अमेरिकेसह नाटो देश यूक्रेनच्या समर्थनासाठी पुढे येताना दिसत आहेत. परंतु त्यांची मदत तोकडी पडत आहे. अमेरिका स्वत:ला जगातील शक्तीशाली देश मानत आहे मात्र निर्बंधाशिवाय ते रशियाचं काहीही करू शकले नाहीत.त्यामुळे जगभरात अमेरिकेची नाचक्की होत आहे. अशावेळी चीन यूक्रेनचं उदाहरण देत आशियातील देशांना धमकावत आहे. जर या विधानाकडे लक्ष दिल्यास त्याचा इशारा भारताच्या दिशेने असल्याचं दिसून येत आहे.
चीनचे उपपरराष्ट्र मंत्री ली यूचेंग धमकी देत म्हणाले की, अमेरिका हिंद प्रशांत महासागरात जे विस्ताराचं धोरण राबवत आहे. ते यूरोपातील नाटो विस्तारासारखं आहे. अमेरिकेचे हे धोरण आशियाला नरकात ढकलेल. चीननं क्वॉडवर टीकास्त्र अशावेळी केलंय जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच या समुहाच्या बैठकीत सहभागी झाले होते. क्वॉड गटात अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया देशांचा समावेश आहे. हा गट हिंद प्रशांत महासागरात चीनच्या प्रभावाला टक्कर देत आहे. समुद्री मार्गे होणाऱ्या व्यापाराला चालना देणं या गटाचं उद्दिष्ट आहे. हिंद महासागरात चीनला आव्हान देण्यासाठी अमेरिकेला भारताची साथ हवी. त्यामुळेच संधी मिळताच चीननं भारताला अप्रत्यक्ष धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे.