Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:28 PM2022-03-07T14:28:50+5:302022-03-07T14:30:11+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावं यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका चीननं जाहीर केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. युक्रेन आणि रशियातीलयुद्ध संपुष्टात यावं यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न करण्यात येतील. तसंच दोन्ही देशांसाठी मध्यस्थाची भूमिका घेण्यासाठीही आमची तयारी आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) म्हणाले.
युक्रेनमध्ये झालेलं नुकसान पाहता देशाला आवश्यक अशी सर्व मदत पाठविण्यात येईल असंही चीननं जाहीर केलं आहे. त्यासोबतच रशियासोबत असलेली घट्ट मैत्री यापुढेही कायम राहणार असल्याचंही वांग यी म्हणाले. भारतीय वेळेनुसार आज दुपारी साडेपाच वाजता युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. याआधी रशियानं फ्रान्सच्या विनंतीनंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करता यावं यासाठी युक्रेनच्या चार शहरांमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आजच्या बैठकीत तरी तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
#China will make active efforts to resolve the conflict in #Ukraine, said China's Foreign Minister.
— NEXTA (@nexta_tv) March 7, 2022
The #Chinese Red Cross will soon provide assistance to Ukraine. In addition, China hopes that #Russia and Ukraine will make progress in the third round of negotiations. pic.twitter.com/ol17ksC5kW
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी तैवान मुद्द्यावरही भाष्य केलं. तैवानचा मुद्दा युक्रेनच्या परिस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे कारण ते दोन देशांमधील एक देशांतर्गत प्रकरण आहे, असं वांग ली म्हणाले. तसंच ते म्हणाले की अमेरिकेतील "काही पक्ष" तैवानला धोक्याच्या दिशेने ढकलण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. चीनचा उदय रोखण्यासाठी तैवानचा वापर करणे हा त्यांचा उद्देश होता, असंही ते म्हणाले.
मोदींनी केली जेलेन्स्की यांच्याशी चर्चा
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मोदी आणि जेलेन्स्की यांच्यात जवळपास ३५ मिनिटं फोनवर संवाद झाला. आज सकाळी ११.३० मिनिटांनी मोदींनी जेलेन्स्की यांनी फोन केला. त्यानंतर दोघांमध्ये सद्य परिस्थितीवर चर्चा झाली.
मोदी पुतीन यांच्याशीही बोलणार
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही फोन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनमध्ये अजूनही अडकून असलेल्या भारतीयांच्या सुटकेच्या मुद्द्यावर मोदी पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण दोन्ही देशांमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती अधिक चिघळत असताना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आता व्यक्त केली जात आहे.