येत्या १६ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या रशिया युक्रेनवर हल्ला करणार असल्याचा दावा अमेरिकेने केलेला असतानाच रशियन रणगाडे आणि तोफांनी अचानक दिशा बदलल्याने खळबळ उडाली आहे. रशियन रणगाडे युध्दभूमीवरून पुन्हा बेस कँम्पकडे माघारी जातानाचे व्हिडीओ जारी झाले आहेत. त्यातच रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी व्हिडीओ जारी केल्याने युद्ध टळल्याचे बोलले जात आहे. तरी देखील अमेरिकेला रशियाच्या या हालचालींवर संशय असून बेसावध न राहण्याचा सल्ला नाटोला दिला आहे.
यूक्रेन चे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांनी १६ फेब्रुवारीला हल्ला होईल अशी पोस्ट केली होती. यामुळे युद्ध सुरु होणार हे पक्के झाले होते. अशातच रशियाचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव यांनी मंगळवारी सांगितले की, दक्षिणी आणि पश्चिमी सैन्य दलांच्या युद्धाभ्यासानंतर त्यांना बेस कँपवर जाण्यास सांगितले आहे. अन्य भागांमध्ये युद्धाभ्यास सुरु राहणार आहे. यामध्ये नौदलांचाही युद्धाभ्यास सुरु राहिल .
मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये रणगाडे, एएमपीव्ही, स्वयंचलित तोफांसह लष्करी वाहने त्यांच्या तळांवर परतताना दिसतात. मंत्रालयाने एक क्लिप शेअर केली आहे ज्यामध्ये T-72Bz टँक ड्रिल साइटवरून परतताना दिसत आहेत. रशियन टँक परत आल्याने संभाव्य युद्धाचा धोका टळू शकतो, असे म्हटले जात आहे.
रशियानेही बेलारूसला देखील आपले सैन्य पाठवले आहे. बेलारूसबरोबर संयुक्त लष्करी सराव करत आहेत. रशियाने उत्तरेकडील सीमेवरून आक्रमण करण्यासाठी आपले सैन्य बेलारूसला पाठविल्याचा अंदाज तज्ज्ञांनी लावला होता.