रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर, अमेरिकेनंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. मात्र, रशियाच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत, या नरसंहाराला केवळ रशियाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ''या युद्धासाठी जग रशियालाच जबाबदार ठरवेल, या युद्धातून होणाऱ्या विनाशाला रशिया एकटाच कारणीभूत असणार आहे. या विनाशातू होणाऱ्या मृत्यू आणि नुकसानीची जबाबदारी रशियाची आहे. अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र एकत्र येऊन यास प्रत्युत्तर देणार'', असल्याचेही जो बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच, जी-7 ची बैठकही बोलविण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
युक्रेननं विमानतळं केली बंद
रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने आपली काही विमानतळे बंद केली आहेत. रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेननंही प्रत्युत्तर दिलंय.
आम्ही बचाव करू आणि जिंकू - युक्रेन
'युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. पुतिन यांनी आदेशाने रशियाने नुकतेच युक्रेनवर आक्रमण सुरू केले आहे. सध्या शांततापूर्ण युक्रेनियन शहरे दडपणाखाली आहेत, हे आक्रमकतेचे युद्ध आहे. जग पुतीनला थांबवू शकते आणि थांबवूच शकते. मात्र, आता कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.