रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर जगाचे लक्ष रशिया-युक्रेनकडे लागले आहे. मात्र, हा नेमका वाद काय आहे, हे पाहावे लागेल.
रुस आणि युक्रेन यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून तणाव आहे. युक्रेन हा युरोपीयन संघाशी जवळीक असलेला देश आहे, हीच जवळीक रशियाला आवडत नाही. सन 1991 साली युक्रेनने सोवियत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली. त्यानंतर, युरोपीयन संघासोबत युक्रेनची जवळीक वाढली. युक्रेन हा अमेरिकन नेतृत्वातील सैन्य संघटना NATO चा सदस्य बनू इच्छित आहे. मात्र, रशियाला हे पसंत नाही. त्यामुळेच, अमेरिका आणि नाटोकडून रशियाला हा शब्द हवा आहे की, युक्रेनला नाटोचा सदस्य केले जाणार नाही. मात्र, अमेरिका आणि पाश्चात्य देश रशियाच्या मतावर सहमत नाहीत.
रशियांच्या सीमेजवळ नाटोचे सैन्य
रशियाच्या सीमेनजीक नाटोच्या सैनिकांची तुकडी पोहोचू नये, अशी रशियाची इच्छा आहे. त्यातूनच, युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियाने सीमारेषेवर मोठा सैन्य फौजफाटा लावला आहे. युक्रेनमुळे अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेले देश रशियाच्या सीमारेषेजवळ तळ ठोकत असल्याचं दावा रशियाने केला आहे. 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर, काही महिन्यांतच युक्रेनच्या डोनत्सक आणि लुहांस्क मध्ये रुस समर्थक फुटीरतावाद्यांनी या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र घोषित केले. फ्रान्स आणि जर्मनीने या प्रदेशांना स्वतंत्र घोषित करण्यासाठी युक्रेन आणि रशिया यांच्यात करारही झाला, पण वाद कायम राहिला आहे.
अमेरिका-रशिया देशांत तणाव
युक्रेनच्या डोनत्सक आणि लुहांस्क या प्रदेशाला व्लादीमीर पुतीन यांच्याकडून स्वतंत्र देशाच्या मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर जागतिक पातळीवर तणाव अधिक निर्माण झाला. सोवियत संघांपासून स्वतंत्र झाल्यानंतर अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये अधिक तणाव बनला आहे. युक्रेंनवरील संकट हे अमेरिका आणि रशियातील वर्चस्वाची लढाई असल्याचंही मानलं जात आहे.
जेलेंस्की राष्ट्रपती झाल्यानंतर मिळाली गती
युक्रेनच्या राष्ट्रपतीपदावर सन 2019 मध्ये व्लादीमीर जेलेंस्की यांची निवड झाल्यानंतर युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली गतीमान झाल्या. त्यामुळे, युक्रेनच्या सीमारेषेजवळ रशियन सैन्याचा जमाव होत होता, त्यावरुन अमेरिका आणि नाटोने नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच, अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर काही निर्बंधही लादले. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार आत्तापर्यंत या तणावयुद्धात 3 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
नरसंहारासाठी केवळ रशियाच जबाबदार - बायडन
युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. मात्र, रशियाच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत, या नरसंहाराला केवळ रशियाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ''या युद्धासाठी जग रशियालाच जबाबदार ठरवेल, या युद्धातून होणाऱ्या विनाशाला रशिया एकटाच कारणीभूत असणार आहे. या विनाशातू होणाऱ्या मृत्यू आणि नुकसानीची जबाबदारी रशियाची आहे. अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र एकत्र येऊन यास प्रत्युत्तर देणार'', असल्याचेही जो बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच, जी-7 ची बैठकही बोलविण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.