कीव – रशियाच्या यूक्रेनवर हल्ल्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. रशियन सैन्यानं राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी सैन्याची कारवाई सुरू केली आहे. त्यात मिसाइल, रॉकेट हल्ले घडवून आणले जात आहे. अशात मॉस्कोद्वारे सुरु असलेल्या या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून रशिया यूक्रेनविरोधात क्रूर पद्धतीनं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रशियाचा हल्ला यूक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, यूक्रेनच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका सायकलस्वारावर अचानक हवेतून बॉम्ब हल्ला होता. त्यात चहुबाजूने आगीच्या ज्वाला उठतात. ४० सेकंदच्या या व्हिडीओनं तुमच्याही अंगावर काटा येईल. रशियानं गुरुवारी यूक्रेनवर हल्ला केला. युद्धाच्या पहिल्या दिवशी १३७ लोकांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. आजही यूक्रेनवर हल्ले सुरुच आहेत.
यूक्रेनच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांच्या आवाजानं हाहाकार माजला आहे. रशिया यूक्रेन युद्धात शेकडो सैनिक जखमी झाले आहेत. या युद्धात निर्दोष लोकंही मारली जात आहेत. रशियाच्या हवाई हल्ल्यात ठार झालेला सायकलस्वार त्यापैकीच एक आहे. लोकं जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत आहेत. सुरक्षित स्थळ गाठण्यासाठी रेल्वे, रस्त्यांवर गर्दी दिसून येते. तर यूक्रेनच्या अधिकृत सूत्रांनुसार, शुक्रवारचा दिवस यूक्रेनसाठी ब्लॅक फ्रायडे सिद्ध होण्याची शक्यता आहे. कारण रशियाने हल्ल्याची तीव्रता दुप्पट केली आहे.
यूक्रेन एकाकी पडले
रशियाने यूक्रेनची राजधानी कीवला घेरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. संकटाच्या वेळी साथ न देणाऱ्या अमेरिका आणि नाटोवर त्यांनी टीका केली आहे. त्याचसोबत यूक्रेनला एकटं पाडलं असून सक्तीची सैन्य भरती करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. त्यामुळे देशातील १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देशातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जेणेकरून रशियासोबत युद्ध शेवटच्या क्षणापर्यंत लढलं जाईल. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून कीव शहरात स्फोट होत आहेत. क्रूज आणि बॅलेस्टिक मिसाइलनं हे हल्ले होतायेत. यूक्रेननंही रशियाच्या हल्ल्याला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. रशियाचं एक विमान पाडल्याचं यूक्रेननं दावा केला आहे.