Russia vs Ukraine War: ना रशिया...ना युक्रेन... 'या' देशात होऊ शकते पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:25 PM2022-02-25T20:25:08+5:302022-02-25T20:25:50+5:30
Russia vs Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता अखेर शमण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. दोन्ही देश एकमेकांशी चर्चा करण्यासाठी तयार झाले आहेत आणि यातून लवकरच एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Russia vs Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता अखेर शमण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. दोन्ही देश एकमेकांशी चर्चा करण्यासाठी तयार झाले आहेत आणि यातून लवकरच एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच दरम्यान अशीही माहिती समोर आली आहे की रशिया आणि युक्रेन दोन्ही देश एकमेकांसोबतची चर्चा तिसऱ्या देशात व्हावी अशी मागणी केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चा बेलारुसची राजधानी मिन्स्क (Minsk) शहरात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रशियाच्यावतीनं तसा प्रस्ताव युक्रेनला पाठविण्यात आल्याचंही बोललं जात आहे.
सर्वातआधी रशियाकडून युक्रेनला प्रस्ताव देण्यात आला होता. युक्रेननं जर सैन्य कारवाई थांबवली तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असा प्रस्ताव रशियानं दिला. त्यास युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशियाला चर्चेसाठी तयार असल्याचं उत्तर दिलं आहे. रशिया त्यांचं एक प्रतिनिधींचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवेल असं सांगण्यात आलं आणि ही चर्चा रशिया किंवा युक्रेनमध्ये नव्हे, तर तिसऱ्याच देशात होण्याची दाट शक्यता आहे.
दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठीची तारीख किंवा वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. तसंच रशियानं त्यांच्या कारवाईतही कोणतीही शिथिलता आणलेली नाही. दोन्ही देशांकडून अजूनही युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या राजधानी कीववर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा रशियानं केला आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आता रशियाच्या ताब्यात आलं आहे. तर युक्रेनकडूनही रशियाचे १ हजार सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तसंच प्रसार माध्यमांमधील वृत्तानुसार रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे १३७ नागरिक मारले गेले आहेत. पण युक्रेनचं किती सैन्य मारलं गेलंय याचा कोणताही आकडा समोर आलेला नाही. युक्रेननं मात्र रशियाची लढाऊ विमानं पाडल्याचाही दावा केला आहे. रशियानं मात्र सर्व दावे फेटाळून लावले आहेत.