रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. दिवसागणिक परिस्थिती अत्यंत भीषण होत आहे. याच दरम्यान युक्रेनची चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. कीव्हमधील Demydiv गावातील एका धरणावर रशियाकडून हल्ला करण्यात आला आहे. यामुळे गावात पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने सैन्याला देखील लोकांना बाहेर काढणं कठीण झालं आहे. याच दरम्यान गावामध्ये रशियाच्या वतीने हल्ले सुरूच आहेत. नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
वेगाने बचावकार्य सुरू आहे. मात्र धरणातून येणाऱ्या पाण्याची पातळी आता वाढली आहे. युद्धासोबतच आता लोकांना पुरापासून देखील स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे युक्रेनमधील या गावातील लोक दोन संकटाचा एकत्र सामना करत आहेत. मारियूपोल ते खारकीव्हपर्यंत रशियाने आपले हल्ले आता वाढवले आहेत. कीव्हवर तर सातत्याने बॉम्ब फेकले जात आहेत. अत्यंत वेगाने हालचाली होत असलेल्या पाहायला मिळत आहेत. युद्धादरम्यान रशियाने आतापर्यंत तब्बल 1403 वेळा एअर स्ट्राईक केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
100 हून अधिक निष्पाप लहान मुलांचा मृत्यू
एअर स्ट्राईकमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 100 हून अधिक निष्पाप लहान मुलांचा देखील मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील युद्धाचा सर्वसामान्य नागरिकांवर वाईट परिणाम होत आहे. अनेक जण देश सोडून जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनमध्ये दर मिनिटाला 55 मुलं निर्वासित होत असल्याचं युनिसेफने म्हटलं आहे. म्हणजेच युद्ध सुरू झाल्यानंतर प्रत्येक सेकंदाला एक मूल निर्वासित होत आहे. आतापर्यंत 75,000 मुले निर्वासित झाल्याचा अंदाज आहे. या युद्धाचा लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसेच युद्धात दररोज 5 निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे. युक्रेनमधील धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे.
युद्धात दररोज 5 मुलांना गमवावा लागतोय जीव; मिनिटाला 55 मुलं निर्वासित
युक्रेनच्या अभियोजक जनरलच्या कार्यालयाने टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये कीव्ह, खार्किव्ह, डोनेटस्क, चेर्निहाइव्ह, सुमी, खेरसॉन, मायकोलायव्ह आणि झायटॉमिर प्रदेशात मुलांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. दररोज किमान पाच लहान मुलांचा आगीमुळे मृत्यू होत आहे. बॉम्बहल्ला आणि गोळीबारात 400 हून अधिक शैक्षणिक संस्थांचे आधीच नुकसान झाले आहे, त्यापैकी 59 पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. डोनेट्स्क-119, खार्किव्ह-50, मायकोलायव-30, सुमी-28, कीव्ह-35, खेरसॉन-21 आणि कीव्ह शहरातील 24 संस्था नष्ट झाल्या आहेत. 11 आरोग्य सुविधा आणि तीन पुनर्वसन केंद्रांवर गोळीबार करण्यात आला. काळजात चर्र करणाऱ्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. युक्रेनने अनेक प्रमुख शहरांमध्ये रशियन सैन्याच्या हवाई हल्ल्यांबाबत अलर्ट जारी केला आहे.