खेरसानमध्ये रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी, युद्ध संपण्यास सुरूवात झाली आहे, असे म्हटले होते. मात्र, या विधानाच्या दुसऱ्यात दिवशी कीवमध्ये दोन स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंगळवारी 15 नोव्हेंबर 2022 रोजी कीवमध्ये किमान दोन स्फोट ऐकू आले आणि या स्फोटांनंतर धुराचे लोट उठल्याचेही दिसून आले.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बाली येथे झालेल्या 20 देशांच्या समुहाच्या नेत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले आणि त्यांच्या भाषणाच्या काही तासांनंतर, संपूर्ण युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. या इशाऱ्यानंतर, दोन स्फोट झाले, जे कीव शहराने ऐकले आणि धूर उठतानाही बघितला. यातच, रशियाने देशभरातील हल्ल्यांमध्ये सुमारे 100 क्षेपणास्त्रे डागली, असे युक्रेनच्या हवाई दलाच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.
कीवमध्ये ब्लॅकआऊट घोषित -खेरसान मधून माघार घेतल्यानंतर, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर हल्ला तीव्र केला आहे. मंगळवारी रशियन सैन्याने कीव मधील दोन निवासी इमारतींना लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर शहरात धोक्याचा सायरन वाजू लागला. खेरसानमधून रशियन सैन्याच्या माघारीनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. याच बरोबर युक्रेनने तैनात केलेल्या एअर डिफेंस सिस्टिमने बरेच रशियन क्षेपणास्त्रेही पाडली. रशियाच्या या हल्ल्यानंतर, युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी ब्लॅकआऊटची घोषणा केली आहे.
अधिकारी म्हणाले गंभीर स्थिती -युक्रेन मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने परिस्थिती अत्यंत "गंभीर" असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी, देशातील नागरिकांनाही विजेचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. वीज पुरवठादार DTEK ने राजधानीमध्ये आणीबाणीचा 'ब्लॅकआउट' जाहीर केला आहे. अधिकार्यांनी इतरत्रही अशाच पद्धतीची घोषणा केली आहे.