वॉशिंग्टन : रशियाच्या लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणूक करणे, हे भारताच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. भारताने रशियाच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहणे कमी करावे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. यासाठी आम्ही भारतासोबत काम करणे सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी वार्षिक संरक्षण अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान संंसदेच्या समितीला सांगितले.संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन हे खासदार जो विल्सन यांच्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. जो विल्सन हे अमेरिकन संसदेत भारताचे समर्थक आहेत; परंतु, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबाबत घेतलेल्या तटस्थ भूमिकेवरून भारतावर ते टीका करीत आहेत. भारताने अमेरिकेची बाजू घ्यावी, यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही भारताला कोणत्या शस्त्रास्त्र तंत्राचा प्रस्ताव देऊ शकतो, असा सवाल विल्सन यांनी विचारला होता.
पेन्टॉगॉनने व्यक्त केली चिंता...- भारताच्या संरक्षण खरेदीत विविधता आणण्यासाठी अमेरिका उत्साहित आहे, असे पेन्टॉगॉनने सोमवारी म्हटले होते. यासोबत रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयावरही पेन्टॉगॉनने चिंता व्यक्त केली.- पेन्टॉगॉनचे प्रसिद्धी सचिव जॉन किर्बी यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताने गेल्या दहा वर्षांत आपल्या संरक्षण खरेदीत आणलेल्या विविधतेने आम्ही उत्साहित आहोत. त्यामुळे आम्ही भारताच्या गरजेनुसार चर्चा सुरू ठेवणार आहोत. - विशेषत: या सौद्याबाबत आम्ही आमची चिंता स्पष्ट केली आहे. भारताने ऑक्टोबर २०१८ मध्ये रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी पाच अब्ज डॉलरचा करार केला होता.