किव्ह - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला भीषण संघर्ष महिना होत आला तरी अद्याप सुरू आहे. रशियासोबतचं युद्ध भयावह होत असतानाच युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियाशी संबंध असलेल्या युक्रेनमधील ११ राजकीय पक्षांवर निलंबनाची कारवाई केली आहे. हे राजकीय पक्ष युक्रेनमध्ये रशियाला पाठिंबा देत होते आणि सर्व माहिती पुरवत होते, असा आरोप आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध २५ दिवसांनंतरही सुरूच आहे. त्यातून ना रशियन सैन्य मागे हटण्यास तयार आहे. ना युक्रेनचे सैन्य आपला पराभव मान्य करत आहेत. त्यामुळे आता हे युद्ध कधीपर्यंत लांबेल हे सांगणे कठीण आहे.
त्यातच आज रशियाने युक्रेनचे किनारी शहर असलेल्या मारियुपोलमध्ये एका आर्ट स्कूलवर भीषण हल्ला केला. तिथे ४०० जण आश्रयाला होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाच्या बॉम्बहल्ल्यामुळे शाळेची इमारत नष्ट झाली आहे. तसेच अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असू शकतात. मात्र या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
मारियोपोलच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात सुमारे ४० हजार जणांनी शहर सोडून पलायन केले आहे. आतापर्यंत या शहरातील १० टक्के लोकांनी येथून पलायन केले आहे.