नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा सोमवारी 19 वा दिवस होता. हे युद्ध दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे आणि दोन्ही बाजूंचे गंभीर नुकसान होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाने जग दोन गटात विभागले गेले आहे. काही बलाढ्य देश युक्रेनच्या बाजूने आहेत. तर काही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आहेत. दरम्यान, स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी पुतीन यांना खुले आव्हान दिले आहे.
मस्क यांचं पुतिन यांना खुलं आव्हान -टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ असलेले एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना वन-टू-वन चॅलेन्ज देत एक ट्विट केले आहे. मस्क म्हणाले, आमने-सामनेच्या लढाईसाठी पुतीन तयार आहेत का, या सिंगल सामन्यात युक्रेन पणाला असेल. रशियन भाषेत करण्यात आलेल्या या ट्विटला पुतिन यांच्यासाठी थेट आव्हान मानले जात आहे.
एका अन्य ट्विटमध्ये मस्क यांनी रशियन राष्ट्रपतींच्या ऑफिशियल ट्विटर हँडलला टॅग करत लिहिले, आपण या सामन्यासाठी तयार आहात? एलोन मस्क उघडपणे युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मस्क यांनी, भीषण युद्ध सुरू असतानाच आपल्या कंपनीच्या स्टरलिंक सॅटेलाइटच्या माध्यमाने युक्रेनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी देऊन मदत केली होती.
गंभीर आहेत मस्क -मस्क यांच्या चॅलेन्ज असलेल्या ट्विटवर युजर्सचे रिअॅक्शन्सदेखील येत आहेत. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, रशियाचे राष्ट्रपती हा सामना सहज जिंकतील. यावर उत्तर देताना मस्क म्हणाले, जर पुतिन पाश्चिमात्य देशांना सहज अपमानित करू शकत असतील, तर त्यांनी आव्हान स्वीकारायला हवे, पण ते तसे करणार नाहीत.