Russia-Ukraine War: रशियाविरुद्ध एल्गार! आता युरोपियन युनियन युक्रेनला धाडणार लढाऊ विमानं, युद्ध आणखी तीव्र होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:58 PM2022-02-28T20:58:01+5:302022-02-28T20:59:10+5:30
Russia-Ukraine War: लढाऊ विमानांची युक्रेननं केलेली मागणी आता यशस्वी होताना दिसत आहे. युरोपियन युनिअननं युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी लढाऊ विमानांची मदत करण्याची घोषणा केली आहे.
Russia-Ukraine War: लढाऊ विमानांची युक्रेननं केलेली मागणी आता यशस्वी होताना दिसत आहे. युरोपियन युनिअननं युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी लढाऊ विमानांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यूएनचे परराष्ट्रनितीचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "आम्ही युक्रेनला लढाऊ विमानं उपलब्ध करुन देत आहोत. दारुगोळ्यासह आम्ही युद्धासाठी आवश्यक सर्व शस्त्रास्त्र देखील युक्रेनला उपलब्ध करुन देत आहोत", असं जोसेफ बोरेल म्हणाले.
रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी लढाऊ विमानांची गरज असून त्यासाठीची मदत करण्याचं आवाहन युक्रेनच्या परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी केलं होतं. युक्रेनच्या हवाईदलातील पायलट्स सहजपणे नियंत्रित करु शकतील अशा लढाऊ विमानांची आवश्यकता असून ते यूएनमधील सदस्य देशांकडे उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले होते.
दुसरीकडे बेलारुसबाबत युरोपियन युनियननं हायअलर्ट देखील जारी केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रशियाकडून बेलारुस येथे अण्वस्त्र तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रशियानं थेट अण्वस्त्र सज्ज ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनंही मोठा निर्णय घेतला आहे. रशियावर जास्तीत जास्त आर्थिक निर्बंध लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसंच अमेरिकेकडून बेलारुसस्थित दूतावास देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच रशियातील आपल्या नॉन इमर्जन्सी स्टाफला मायदेशात परतण्याचे आदेश दिले आहेत.