Russia-Ukraine War: ब्रिटिश आर्मीचा स्नायपर युक्रेनमध्ये घात लावून बसलाय! पत्नीशी खोटं बोलून घरातून निघाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 09:35 AM2022-03-06T09:35:01+5:302022-03-06T09:35:10+5:30
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका ब्रिटिश सैनिकाची कहाणी खूप चर्चेत आहे. हा सैनिक आपल्या पत्नीला खोटं बोलून थेट युक्रेनमधील लोकांच्या मदतीसाठी आला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज 11वा दिवस आहे. युद्धादरम्यान युक्रेनमधून अनेक किस्से समोर आले आहेत, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. काही कथा शौर्याच्या आहेत, तर काही भावनिक आहेत. दरम्यान, एका माजी ब्रिटिश सैनिकाची कहाणी समोर आली आहे, जो आपल्या पत्नीशी खोटं बोलून रशियाशी युद्ध करण्यासाठी युक्रेनला गेला. त्याने पत्नीला बाहेर फिरायला जात असल्याचे सांगितले होते.
बायकोला खोटं बोलून युक्रेन गाठले
द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हा माजी सैनिक युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान लोकांना मदत करण्यासाठी आणि रशियाशी लढण्यासाठी गेला आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने पत्नीला आपण पक्षीनिरीक्षणासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. पण तो आपल्या पत्नीशी खोटं बोलला आणि थेट युक्रेनला पोहचला.
ब्रिटनचा माजी सैनिक युक्रेनमध्ये
हा ब्रिटिश सैनिक ब्रिटनमधील विरलचा रहिवासी आहे. तो ब्रिटनवरुन पोलंडला आला आणि नंतर सीमा ओलांडून युक्रेनमध्ये प्रवेश केला. हा माजी सैनिक रशियाविरोधात युक्रेनच्या लष्कराला मदत करण्यासाठी गेला आहे. त्याला दोन मुलं आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर तो म्हणाला की, मी युक्रेनला लढाईत सहभागी होण्यासाठी आल्याचे कळल्यावर पत्नी घाबरली असेल. पण, लवकरच मी तिला फोन करुन सर्व काही समजावून सांगेन.
ब्रिटिश सैन्यात स्नायपर म्हणून काम केले
रिपोर्टनुसार, ब्रिटनमधून युक्रेनमध्ये गेलेल्या या व्यक्तीने ब्रिटीश आर्मीमध्ये स्नायपर म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. या कठीण काळात आपण युक्रेनच्या लोकांना मदत केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. युक्रेनच्या लोकांना अनुभवी सैनिकांची गरज आहे आणि त्यांना तो अनुभव आहे. त्याच्यासारखे आणखी अनेक लोक ब्रिटनमधून युक्रेनमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.