Russia Ukraine War: रशियाची हकालपट्टी करा किंवा तुम्हीच बरखास्त व्हा, जेलेन्स्कींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:29 AM2022-04-06T07:29:20+5:302022-04-06T07:30:08+5:30
Russia Ukraine War: एक तर रशियाची हकालपट्टी करा किंवा संपूर्ण सुरक्षा परिषदच बरखास्त करा, असा देश सुरक्षा परिषदेचा सदस्य असून तुमच्या नाकावर टिच्चून अत्याचार करीत असल्याचे खडे बाेलही जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले.
कीव्ह : रशियाकडून युक्रेनमध्ये भीषण नरसंहार करण्यात येत असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतून रशियाची हकालपट्टी करण्याची जाेरदार मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे. एक तर रशियाची हकालपट्टी करा किंवा संपूर्ण सुरक्षा परिषदच बरखास्त करा, असा देश सुरक्षा परिषदेचा सदस्य असून तुमच्या नाकावर टिच्चून अत्याचार करीत असल्याचे खडे बाेलही जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले.
जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आभासी पद्धतीने भाषण केले. त्यावेळी युक्रेनमध्ये झालेल्या अत्याचारांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधताना ते म्हणाले, की दुसऱ्या जागतिक युद्धानंतरचे सर्वाधिक भीषण युद्धगुन्हे युक्रेनमध्ये घडत आहेत. जास्तीत जास्त नागरिक मारल्या जातील, अशी परिस्थिती रशियन सैनिक तयार करीत आहेत. नागरिकांना रणगाड्यांखाली चिरडले जाते, महिलांना त्यांच्या मुलांसमाेरच बलात्कार करून ठार मारण्यात येत आहे. रशियन सैन्याने बुकामध्ये जे केले ते केवळ क्राैर्य आहे.
महापाैरांसह संपूर्ण कुटुंब संपविले
माेतीझिन शहराचे महापाैर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना रशियन सैन्याने ठार केल्याचे समाेर आले आहे. हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले आहे. याशिवाय सुमी शहरामध्येही अनेकजणांचे मृतदेह आढळले आहेत. या सर्व नागरिकांना ठार मारण्यापूर्वी त्यांचा अताेनात छळ करण्यात आला हाेता. दरम्यान, रशियाने मायकाेलाईव्हमध्ये पुन्हा हल्ला केला.
चिमुकलीच्या पाठीवर लिहिले नाव आणि नंबर
युक्रेनमध्ये एका लहान मुलीचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र समाेर आले आहे. वेरा मकाेवी असे या मुलीचे नाव आहे. तिच्या पाठीवर मुलीचे नाव व नंबर लिहून ठेवला आहे.रशियाच्या हल्ल्यात मी ठार झाले तर मुलीला काेणाकडे साेपवावे, याबाबत मदत करणाऱ्यांना माहिती असेल, असे तिची आई साशा मकाेवी यांनी साेशल मीडियावर पाेस्ट केले आहे.