"युद्ध नको, शांतता हवी, मुलांना परत बोलवा"; पुतिन यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:12 PM2023-11-29T13:12:05+5:302023-11-29T13:23:24+5:30
Russia Ukraine War : सोशल मीडियावर आंदोलनाचे अनेक व्हिडीओ दिसत आहेत. यामध्ये रशियामध्ये युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या माता, बहिणी, मुली आणि पत्नींनी भाग घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष 9 महिने उलटून गेले, पण युद्धावर कोणताही तोडगा निघालेला नाही. हजारो रशियन सैनिक अजूनही युक्रेनमध्ये लढत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या कुटुंबीयांनी राग व्यक्त केला आहे. व्लादिमीर पुतिन यांच्यावर ते संतप्त झाले आहेत. रशियन सैनिकांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने राजधानी मॉस्कोमध्ये निदर्शने केली असून त्यांना त्यांची मुलं आणि पती परत हवे आहेत.
सोशल मीडियावर आंदोलनाचे अनेक व्हिडीओ दिसत आहेत. यामध्ये रशियामध्ये युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या माता, बहिणी, मुली आणि पत्नींनी भाग घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. आता पुतिन यांनी दिलेले वचन पाळावे, अशी महिलांची मागणी आहे. वर्षभरापूर्वी घर सोडलेल्या सैनिकांच्या पत्नी म्हणतात की त्यांना युद्ध नको, शांतता हवी आहे. त्यांना लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी परत आणावं.
"एक वर्ष झालं, आम्हाला आमची मुलं परत हवी आहेत"
युद्धाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनी व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे की, "आम्हाला शांतता हवी आहे. एक वर्षापूर्वी युक्रेनमध्ये लढण्यासाठी गेलेल्या सैनिकांना आता मायदेशी आणलं पाहिजे. ते असं का करत नाहीत? आमचं सैन्य जगात लढत आहे. आज ते सर्वोत्कृष्ट सैन्य बनले असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की ही शेवटच्या सैनिकापर्यंत सैन्याला तिथेच राहावं लागेल."
आंदोलक महिला म्हणाल्या, "आमच्या मुलांनी देशासाठी लढा दिला आहे. आपलं रक्त सांडलं आहे. आता त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे परतावे, पण सरकार असं का करत आहे?" युक्रेनमधील काम पूर्ण झाल्यानंतर सैन्य परत आणले जाईल, असं आश्वासन रशियन सरकारने दिले होते, असं या महिलांचं म्हणणं आहे. क्रेमलिनने सध्या युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे काम पूर्ण झालेलं नाही. त्यांची तिथे गरज असते. युद्ध अजून संपलेले नाही. युद्ध संपताच सैनिक परत येतील. सध्या ते मातृभूमीसाठी कार्यरत आहेत असं म्हटलं आहे.