युद्धाच्या २५ व्या दिवशी युक्रेनचे किनारपट्टीवरील महत्वाचे शहर मारियापोलमध्ये भीषण लढाई सुरु आहे. बंदर असल्याने युक्रेनला समुद्रमार्गे जगाशी जोडणारे हे शहर आता रशियन फौजांच्या ताब्यात जाणार आहे. ठिकठिकाणी रशियाचे सैनिक आणि रणगाडे दिसू लागले आहेत. अशातच युक्रेनी सैन्याला ५ वाजेपर्यंत शरणागती पत्करण्याचा इशारा या शहरात देण्यात आला आहे. या शहराची अवस्था अशी झाली आहे की, जवळपास ८० टक्के इमारती नेस्तनाभूत करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे जगभरातून युक्रेनला मदत केली जात आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा मोठी मदत जाहीर केली आहे. मोल्दोवाला युक्रेनी शरणार्थींना मदत करण्यासाठी अमेरिका ३० दशलक्ष डॉलर्सची मदत देणार आहे. या देशात बहुतांश युक्रेनी नागरिकांनी शरण घेतली आहे. ऑस्ट्रेलिया युक्रेनमधील वीजनिर्मिती प्लांट सुरु ठेवण्यासाठी 70 हजार टन कोळसा मोफत पुरविणार आहे.
अशाप्रकारे मदतीचा ओघ सुरु असताना हंगेरीच्या सीमेवर सुरक्षा रक्षकांनी करोडो युरो पकडले आहेत. माजी खासदार कोटवीत्स्की यांच्या पत्नीने झकरपट्ट्याच्या माध्यमातून युक्रेनच्या लोकांसाठी मदत मागितली होती. या मदतीसाठी उभे राहिलेले हे पैसे असल्याचे सांगितले जात आहे. ही रक्कम थोडी थोडकी नसून $2.8 दशलक्ष आणि १.३ दशलक्ष युरो एवढी मोठी आहे.
दुसरीकडे कीव्हमधील एका शॉपिंग सेंटरला भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ खूप दूरवरून दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. युक्रेनी सैन्याने फुटीरतावादी गटाच्या गुप्तहेर संघटनेचा कमांडर सर्गेई माशकिन याला ठार केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे, मात्र चर्चा अयशस्वी झाल्यास तिसरे महायुद्ध होऊ शकते, असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी, झेलेन्स्की म्हणाले की मारियुपोलवरील हल्ल्याची इतिहासात नोंद ठेवली जाईल, कारण रशियाने युद्ध गुन्हा केला आहे. शाळेमध्ये ४०० लोक शरणार्थी होते. त्यांच्यावर हल्ला केला आहे.