Russia Ukraine War: पुतिन यांच्या दबावासमोर झुकले चार युरोपियन देश, रशियाकडून गॅस खरेदीसाठी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:51 PM2022-04-28T12:51:12+5:302022-04-28T12:51:44+5:30
Russia Ukraine War: युरोपमधील चार देशांनी पुतीन यंची ही अट मान्य केली आहे. हे देश आता रशियाचे चलन असलेल्या रुबलमध्येच गॅस खरेदी करणार आहे. मात्र या चार देशांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत.
मॉस्को - रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी हल्लीच नैसर्गिक गॅस खरेदीदारांकडून रुबलमध्ये पेमेंट करण्याची मागणी केली होती. त्यांनी धमकी देताना सांगितले की, जो खरेदीदार रुबलमध्ये पेमेंट करणार नाही. त्याचा गॅस पुरवठा थांबवण्यात येईल. एका रिपोर्टनुसार युरोपमधील चार देशांनी पुतीन यंची ही अट मान्य केली आहे. हे देश आता रशियाचे चलन असलेल्या रुबलमध्येच गॅस खरेदी करणार आहे. मात्र या चार देशांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार रशियन गॅस क्षेत्रातील अग्रणी गजप्रोम पीजेएससीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार युरोपीयन गॅस खरेदीदारांनी आधीच रुबलमध्ये सप्लायसाठी पेमेंट केलं आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी तशी मागणी केली होती. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले की, इतर खरेदीदार हे भलेही क्रेमलिनच्या अटी अमान्य करत असलीत तरी काही देश पुतिन यांच्यासमोर झुकत आहेत. बुधवारी रशियाने पोलंड आणि बुल्गारियासाठी गॅस सप्लाय थांबवली होती.
सूत्रांनी सांगितले की, दहा युरोपियन कंपन्यांनी रशियाच्या पेमेंटसंबंधीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक गजप्रॉमबँकेमध्ये आधीच खातं उघडलं आहे. रशिया २३ युरोपियन देशांना पाईपलाईनच्या माध्यमातून गॅसचा पुरवठा करत आहे. सद्यस्थितीत रशियातून होणारी गॅसची निर्यात ही पुतीन यांच्यासाठी मोठे हत्यार आहे. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेले पुतिन या हत्याराचा वापर करून रशियावर लागू केलेले आर्थिक निर्बंध कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
मात्र बहुतांश युरोपियन देशांनी रुबलमध्ये पेमेंट करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. रशियन गॅसचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या जर्मनीने पुतीन यांची ही मागणी म्हणजे ब्लॅकमेल असल्याचे म्हटले आहे. युरोपमध्ये आधीच गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितिती रशियाने गॅसपुरवठा थांबवला तर युरोपमध्ये उपासमारीची वेळ येऊ शकते.