BIG BREAKING: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, २५ जणांची तुकडी अटकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:14 PM2022-03-28T20:14:15+5:302022-03-28T20:14:38+5:30
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. स्लोवाकिया-हंगेरी सीमेजवळ युक्रेनी अधिकाऱ्यांनी रशियाच्या स्पेशल सर्व्हिस टीमच्या २५ जणांच्या तुकडीला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या तुकडीचं एकमेव लक्ष्य जेलेन्स्की यांना ठार करणं होतं. दोन्ही देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेलेन्स्की यांच्यावर अनेकदा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे. पण जेलेन्स्की प्रत्येकवेळी बचावले आहेत.
कीव्ह पोस्टद्वारे केल्या गेलेल्या एका ट्विटमधून याची माहिती देण्यात आली आहे. "वोलोदिमीर जेलेन्स्की यांना जीवे मारण्याचा आणखी एक प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. यावेळी स्लोवाकिया-हंगेरी सीमेजवळ रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्वाखालील २५ जणांच्या एका सैन्य समूहाला पकडण्यात आलं आहे. जेलेन्स्की यांची हत्या करण्याचं लक्ष्य या टीमचं होतं", असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रशियाकडून २४ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाल्यानंतर खुद्द जेलेन्स्की यांनीही मी आणि माझं कुटुंब रशियाचं नंबर वन टार्गेट असल्याचं म्हटलं होतं. जेलेन्स्की यांनी रशियाच्या याच तुकडीबाबत सावधानतेचा इशारा देखील याआधी दिला होता. माझी हत्या करण्याचं टार्गेट घेऊन आलेल्या काही रशियन तुकड्या कीव्हमध्ये शिरल्या आहेत आणि ते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या शोधात आहेत, असं जेलेन्स्की यांनी म्हटलं होतं.
फेब्रुवारीतच झाला होता हत्येचा प्रयत्न
याआधी ४ मार्च रोजी टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात जेलेन्स्की यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. एक-दोन नव्हे, तर तीन वेळा तसा प्रयत्न केला गेला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की जेलेन्स्की यांच्या हत्येसाठी वेगवेगळ्या टीम रशियाकडून पाठविण्यात आल्या होत्या. यात रशियाच्या वॅगनर ग्रूप आणि चेचेन स्पेशल फोर्सच्या सैनिकांचा समावेश होता. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्या तुर्कीमध्ये चर्चा होणार असल्याच्या वृत्तावेळीच जेलेन्स्की यांच्या हत्येचा कट उधळण्यात आल्याची बातमी समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही देशांमधील चर्चेत युद्धशांतीबाबत सकारात्मक चर्चा होईल अशी आशा आहे.
युक्रेनला हवी शांतता- जेलेन्स्की
युक्रेनला रशियासोबत शांतता प्रस्थापित करायची आहे आणि यासाठी आम्ही आग्रही आहोत, असं जेलेन्स्की यांनी याआधीच म्हटलं आहे. त्यामुळे जेलेन्स्की तटस्थ भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच रशियाकडूनही सुरक्षेची हमी दिली जाईल असं म्हटलं जात आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वाच्या समोरासमोरील चर्चेतूनच युद्ध शांत होईल असंही जेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे.