रशियाने युक्रेनमध्ये हवाई हल्ले वेगवान केले आहेत. सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे. आज रात्री काहीतरी भयंकर घडणार असल्याचे संकेत मिळू लागले असताना खारकीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या वृत्ताने खळबळ उडविली आहे. याचवेळी जर्मनीची लढाऊ विमानांनी आपल्या देशाची हद्द ओलांडली असून पोलंडच्या आकाशात घिरट्या घालू लागली आहेत.
एकेकाळी पोलंडवर जर्मनी आणि रशियाने मिळून हल्ला केला होता. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात पोलंड महत्वाची भूमिका बजावत आहे. युक्रेन आणि पोलंडची सीमा एकमेकांना लागून आहे. पोलंडने युक्रेनला थोडी थोडकी नव्हे तर २८ लढाऊ विमाने पाठविली आहेत. याचबरोबर सर्व युरोपीय देशांचीमदत पोलंडमार्गेच युक्रेनला केली जात आहे.
फिनलँडने युक्रेनला २५०० असॉल्ट रायफल, दारुगोळा, 1,500 अँटी टँक शस्त्रास्त्रे, 70,000 लोकांना पुरेल एवढे रेशन देण्याची घोषणा केली आहे. स्वीडनने सैन्यासाठी 135,000 फील्ड रेशन, 5,000 हेल्मेट, बॉडी आर्मर, 5,000 एंटी-टँक मिसाईल देण्याची घोषणा केली आहे.
कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी शस्त्रास्त्रे घेऊन युक्रेनच्या दिशेने कूच केली आहे. 100 कार्ल गुस्ताफ एंटी-आर्मर रॉकेट लॉन्चर घेऊन ते निघाले आहेत. जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्ज यांनी 1,000 टँक विरोधी हत्यारे आणि 500 स्टिंगर मिसाइल पाठविली आहेत. यूरोपीय संघाने देखील शस्त्रास्त्रे पाठविली आहेत. ही सारी एकाच मार्गे युक्रेनला जाऊ शकतात. तो म्हणजे पोलंड. अवघा युरोप एक होऊन ७० लढाऊ विमाने युक्रेनला देणार आहे. यामुळे पोलंड खूप महत्वाचा दुवा ठरला आहे.
स्वत:ची कवचकुंडले काढून युक्रेनच्या मदतीला पाठविली मग पोलंडचे संरक्षण कोण करणार, या उद्देशाने जर्मनीची लढाऊ विमाने या साऱ्या मदतीची आणि पोलंडची सुरक्षा करण्यासाठी झेपावली आहेत. याचा फोटो जर्मनीने पोस्ट केला आहे. त्यातच भारतासह लाखो परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचा मार्ग पोलंडमधूनच जात आहे, यामुळे रशिया पोलंडवर हल्ला करून युक्रेनची मदत तोडेल अशी भिती युरोपीयन देशांना वाटू लागली आहे.