यु्द्ध आज थांबेल, उद्या थांबेल, अशी आशा युक्रेनियन नागरिक रोजच्या रोज करताहेत. पण, त्यांच्या आशेवर उद्दाम रशिया पाणी ओतत आहे. युक्रेनियन भागात रशियाचे बॉम्बहल्ले आणि गोळीबार सुरूच असल्यानं अनेक नागरिकांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. पण, रशियन सैन्यानं अनेक बंकर्सही उद्ध्वस्त केले आहेत. तात्पुरते बनवलेले हे बंकर्स तरी किती दिवस तग धरणार आणि किती लोकांना त्यात आसरा घेता येणार? बॉम्ब वर्षांवात भिंती पडल्यानं काही युक्रेनियन नागरिक त्या भिंतींखाली दबून ठारही झाले आहेत. बंकरमधील साठ दिवसांच्या वास्तव्याची अशीच एक हृदयद्रावक कहाणी सध्या व्हायरल होते आहे. ॲना झैत्सेवा या २४ वर्षीय महिलेनं तब्बल साठ दिवस बंकरमधलं आपलं जिणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. युद्ध सुरू होताच इतरांप्रमाणे ॲना आणि तिच्या कुटुंबीयांनीही एका बंकरमध्ये आसरा शोधला. या छोट्याशा बंकरमध्ये तब्बल ७० जण राहात होते.
ॲना सांगते, २४ तास बंकरमध्ये राहून आम्हा सगळ्यांनाच उबग आला होता. केव्हा एकदा स्वच्छ सूर्यप्रकाश आपण पाहू असं आम्हाला झालं होतं. पण, थोड्याच दिवसांत आम्हाला कळून चुकलं, इथून बाहेर पडणं म्हणजे थेट मृत्यूशी गाठ. त्यापेक्षा हालअपेष्टांत का होईना, इथे राहाणं हाच जीव वाचवण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. ॲनाला सहा महिन्यांचा लहान मुलगा आहे. त्याला घेऊन आपल्या वृद्ध आई-वडिलांसह ती या बंकरमध्ये राहायला आली. इथे खाण्यापिण्याचे खूपच हाल होऊ लागले. कोणालाच पुरेसं जेवण मिळेना. सर्वच भुकेले, त्यामुळे बंकरमध्ये असलेल्या लोकांमध्ये आपसातच भांडणं आणि मारामाऱ्या होऊ लागल्या. ॲना सांगते, बरेच दिवस तर मी उपाशीपोटीच राहिले. पोटात भुकेची आग पेटलेली असतानाही ‘मला भूक नाही, माझं पोट भरलं आहे’, असं मी भासवत राहिले. त्यामुळे माझ्या वाटेचे दोन घास माझ्या आई-वडिलांना मिळाले. तरीही या वास्तव्यात दोघांचंही वजन दोनच महिन्यांत जवळपास दहा किलोंनी घटलं.. ॲनाच्या सहा महिन्यांच्या मुलासह बंकरमध्ये एकूण १८ मुलं होती. जी थोडी मोठी मुलं होती, त्यांनाही आता कळून चुकलं होतं, पोटभर खाण्यापिण्याचे लाड इथे कोणीच पुरवू शकणार नाही. पोटात भुकेची आग पेटलेली असताना या मुलांनी एक नवीनच खेळ शोधून काढला. कागदावर, भिंतीवर फळांची, खाऊची चित्रं ती काढू लागली आणि एकमेकांना देऊ लागली. हे घे तुला सफरचंद, हा आंबा बघ किती छान आहे!.. आणि हे असं अननस तर तू कधी खाल्लंच नसशील!.. आपल्या आई-वडिलांनाही चित्रांतला हा खाऊ मुलं देऊ लागली, तेंव्हा तर अनेक पालकांना हुंदकाच फुटला..
सतत बॉम्बवर्षाव सुरू असल्यानं बंकरच्या बाहेर निघणं शक्यच नव्हतं. पण, पिण्याच्या पाण्याची अगदीच मारामार व्हायला लगली, तेव्हा जीव मुठीत घेऊन काहीजण बंकरमधून वर येत होते. डबक्यात साठलेलं पावसाचं पाणी किंवा बर्फ खरवडून आणत होते. ॲनालाही तसंच करावं लागलं. आपल्या सहा महिन्यांच्या लहानग्या स्यातोस्लावची तहान भागवण्यासाठी अनेकदा तिनं असं डबक्यातलं पाणी आणलं. मेणबत्तीवर ते गरम करून मुलाला पाजलं! कुठे कोणती हालचाल दिसते का, हे पाहण्यासाठी रशियानं त्या भागात ड्रोनचा पहारा लावलेला होता. हालचाल दिसली की लगेच त्या भागावर बॉम्बचा वर्षाव केला जात असे. त्यांच्या बंकरमधला एक जण खड्ड्यातलं पाणी गोळा करण्यासाठी म्हणून केवळ एक मिनिटच वर आला होता. पण, तेवढ्यात पडलेल्या बॉम्बनं तो गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरात बॉम्बचे तुकडे घुसले. पण, त्याला साधे प्रथमोपचार मिळणंही अवघड झालं. तळ मजल्यावरही एकच शौचालय होतं. तिथे जाणं म्हणजेही मृत्यूला भेटायला जाण्यासारखंच होतं. पुतिनच्या सैन्यानं आपल्याला शोधून काढलंय आणि ते आपल्याला गोळ्या मारताहेत अशा स्वप्नांनी बंकरमधले अनेकजण रात्रीबेरात्री झोपेतून ओरडत उठत. या भीतीदायक स्वप्न आणि वास्तवापासून दूर राहावं यासाठी ॲना आपल्या मुलासाठी सतत गाणं म्हणत असे आणि आपल्या नवऱ्याबरोबरचे आनंदी क्षण आठवून दु:ख विसरण्याचा प्रयत्न करीत असे. या बंकरमधून त्यांची आता नुकतीच सुटका झाली आहे.
अंतापर्यंत मी तुझी वाट पाहीन!ॲनाचा नवरा किरिल हा आधी युक्रेनियन सैन्यात होता. पण, ॲना जेव्हा हॉस्पिटलमध्ये बाळंतपणाच्या वेदना सोसत होती, तेव्हा डोळ्यांत पाणी आणून तिनं किरिलला विनवलं, प्लीज, ही नोकरी सोड.. किरिलनंही तेव्हा सैन्याच्या नोकरीतून राजीनामा दिला. पण, युद्ध सुरू होताच, तो ॲनाला म्हणाला, लाडके, प्लीज आता मला थांबवू नकोस. देशासाठी मला सैन्यात परत जावंच लागेल. दुर्दैवानं युद्धात किरिल गंभीर जखमी झाला. त्यावेळी त्यानं बायकोला फोन करून विचारलं, तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे? ॲनाही हुंदके देत म्हणाली.. किरिल, तू फक्त जिवंतपणी परत येे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझी वाट पाहीन..