Russia Ukraine War: भीषण! युक्रेनमधील बालरुग्णालयावर हल्ला; बचावासाठी नागरिक राजधानीच्या दिशेने धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 07:49 AM2022-03-10T07:49:47+5:302022-03-10T07:50:01+5:30
कीव्ह : रशियाने युक्रेनच्या मारियुपोलमधील बालरुग्णालय आणि प्रसूती वॉर्डवर हल्ला केला असून, यात मोठे नुकसान झाले. कीव्हच्या बाहेरील भागातील ...
कीव्ह : रशियाने युक्रेनच्या मारियुपोलमधील बालरुग्णालय आणि प्रसूती वॉर्डवर हल्ला केला असून, यात मोठे नुकसान झाले. कीव्हच्या बाहेरील भागातील हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक राजधानीच्या दिशेने धावले. रशियाचे हल्ले यापुढे अधिक क्रूर आणि अंधाधुंद असतील, असा इशारा पश्चिमेकडील देशांनी दिला होता. त्यानंतर या घडामोडी घडत आहेत.
राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक, मुले अडकली आहेत. हा हल्ला म्हणजे अत्याचार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किती लोक मारले गेले किंवा जखमी झाले, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मारियुपोलच्या नगर परिषदेने सोशल मीडिया साइटवर सांगितले की, नुकसान प्रचंड होते. दरम्यान, इरपिन या कीव्हच्या उपनगरांतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना एका तात्पुरत्या पुलाच्या निसरड्या लाकडी फळ्या ओलांडून मार्ग काढावा लागला. कारण युक्रेनियन लोकांनी काही दिवसांपूर्वी रशियाची घोडदौड हाणून पाडण्यासाठी कीव्हपर्यंतचा काँक्रीट मार्ग उडवला होता. या भागात अद्यापही तोफगोळ्यांचा आवाज घुमत होता. या सर्व धामधुमीत अग्निशमन दलाच्या जवानांनी एका वृद्धाला गाडीतून सुरक्षित नेले. एका मुलाने सैनिकाचा आधार घेतला आणि एका महिलेने तिच्या कोटाच्या आत मांजर घेऊन पळ काढला. याचवेळी -आमचे युक्रेन- असे शब्द लिहिलेल्या एका अपघातग्रस्त व्हॅनसमोरून ते पुढे सरकले.
युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षण दलाचे सदस्य येव्हेन निश्चुक म्हणाले की, आमच्याकडे याक्षणी वेळ कमी आहे. सध्या युद्धविराम झाला असला, तरी कोणत्याही क्षणी तोफगोळे पडण्याचा धोका जास्त आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नव्याने युद्धविराम जाहीर केला. हजारो नागरिकांना कीव्हच्या आसपासच्या शहरांमधून तसेच मारियुपोल, एनरहोदर आणि व्होल्नोवाखा, पूर्वेकडील इझ्युम आणि ईशान्येकडील सुमी या दक्षिणेकडील शहरांमधून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. सुरक्षित कॉरिडॉर स्थापित करण्याचे पूर्वीचे प्रयत्न रशियन हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाले होते.
‘रशियाला दहशतवादी देश जाहीर करा’
लंडन : युक्रेनचे अध्यक्ष व्हाेलोदिमाय झेलेन्स्की यांनी ब्रिटनच्या खासदारांना रशियाला ‘दहशतवादी देश’ असे जाहीर करण्याचे आवाहन केले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी माझा देश युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचा आदेश दिला, असे सांगून झेलेन्स्की यांनी आमचे आकाश सुरक्षित राहावे, यासाठी रशियावर अत्यंत कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन केले.
झेलेन्स्की यांनी व्हिडीओ लिंकद्वारे हाऊस ऑफ कॉमन्सला मंगळवारी उद्देशून ऐतिहासिक भाषण केले. या भाषणाला संसद सदस्यांनी उभे राहून प्रतिसाद दिला. “आम्ही तुमच्या मदतीच्या अपेक्षेत आहोत, पाश्चिमात्य देशांसाठीही मदतही अपेक्षित आहे. आम्ही मदतीसाठी आणि बोरिस जॉन्सन यांचेही कृतज्ञ आहोत,” असे ते म्हणाले.
रशियावर निर्बंध लादण्यासाठी कृपया दबाब वाढवावा आणि कृपया त्या देशाला दहशतवादी देश म्हणून जाहीर करा. आमच्या युक्रेनचे आकाश सुरक्षित राहील याची खात्री करा,” असेही अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले.