Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यात हॉस्टोमेलचे महापौर ठार, भीषण गोळीबारात गमावले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:57 PM2022-03-07T14:57:16+5:302022-03-07T14:57:54+5:30
Hostomel Mayor Killed By Russian Army: येत्या काही दिवसांत राजधानी कीववर मोठा हल्ला होऊ शकतो, असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
कीव: मागील बारा दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. दरम्यान, युक्रेनमधील हॉस्टोमेलचे महापौर युरी प्रिलिपको हे रशियन लष्कराच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाच्या भीषण गोळीबारात महापौरांना जीव गमवावा लागला असल्याची माहिती युक्रेनियन मीडियामध्ये केली जात आहे. दरम्यान, महापौरांच्या निधनानंतर शहरात खळबळ उडाली आहे.
कीवमध्ये भीषण लढाऊ होणार
दरम्यान, युक्रेनच्या कीवजवळील गावे आणि शहरांमध्ये रशियाने मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि सैन्य जमा केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता कोणत्याही क्षणी रशिया कीववर ताबा मिळवेल, असा दावा युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला आहे. पुढील काही दिवस अतिशय महत्वाचे असल्याचे मत युक्रेनच्या अधिकाऱ्याचे आहे.
आता रशियाला 'धक्का' देणार
युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे शस्त्रास्त्र पुरवठा करण्याची मागणी लावून धरलेली असताना आता युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी मोठी माहिती दिली आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री रेझनिकोव्ह यांनी आम्हाला आवश्यक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा मिळाला असून लवकरच रशियाला जोरदार धक्का देऊ असे विधान केले आहे. त्यामुळे युद्ध आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदींची फोनवर चर्चा
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मोदी आणि जेलेन्स्की यांच्यात जवळपास 35 मिनिटं फोनवर संवाद झाला. चर्चेदरम्यान, युद्ध विरामासाठी रशिया आणि युक्रेनकडून चर्चा केली जात असल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्याचे बोलले जात आहे. यासोबतच भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात परतण्यासाठी युक्रेनकडून केलं जात असलेल्या सहकार्याबाबत मोदींनी जेलेन्स्की यांचे आभार व्यक्त केले आहेत.