Russia-Ukraine War: मला मरायचं नाही, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ५ वर्षाच्या मुलाची हार्त हाक, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:05 PM2022-03-23T13:05:55+5:302022-03-23T13:06:25+5:30
या ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले, मृत्युमुखी पडले याचा अंदाज नाही. मात्र या हवाई हल्ल्यातून बचावलेल्या लोकांनी त्यांचा भयंकर अनुभव शेअर केला आहे.
किव्ह – गेल्या २६ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात घमाशान युद्ध सुरू आहे. अद्याप या युद्धाचा निकाल लागला नाही. रशियानं यूक्रेनच्या मारियुपोल शहराला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. रशियन सैन्याने यूक्रेनवर हवाई हल्ले सुरू केलेत. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी महिला आणि शेकडो मुले एका थिएटरमध्ये लपली होती. या इमारतीत १२०० लोकं लपून बसले होते. मात्र रशियाने याठिकाणी हवाई हल्ला केल्याने ही इमारत कोसळून त्याठिकाणी ढिगारा झाला.
या ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले, मृत्युमुखी पडले याचा अंदाज नाही. मात्र या हवाई हल्ल्यातून बचावलेल्या लोकांनी त्यांचा भयंकर अनुभव शेअर केला आहे. बीबीसी रिपोर्टनुसार, यूक्रेनच्या अनेक शहरांवर लढाऊ विमानं घिरट्या घेत बॉम्बहल्ले करतायेत. २७ वर्षीय टीचर मारिया १० दिवसांपासून थिएटरमध्ये होती. मागील बुधवारी सकाळी १० वाजता ती तिच्या श्वानांसाठी पाणी आणण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराकडे निघाली तितक्यात बॉम्ब हल्ला झाला. या बॉम्बचा आवाज इतका प्रचंड होता की त्यामुळे मारियाच्या कानाचे पडदे फाटले. आजूबाजूच्या इमारतींच्या काचा तुटल्या. या स्फोटात तिच्या चेहऱ्यांवर काचेचे तुकडे रोवले.
जखमी अवस्थेतही ही मारिया जखमी झालेल्या लोकांच्या मदतीला धावली. तिने मुख्य इमारतीच्या जवळ गेली. त्याठिकाणी ढिगारा पडला होता. २ तास तिला काहीच करता आले नाही. २७ वर्षीय व्लादिस्लाव हेदेखील त्याच थिएटरमध्ये होते. त्याचे काही मित्र बंकरमध्ये राहत होते. तो त्यांना भेटायला गेला होता. जेव्हा स्फोट झाला तेव्हा व्लादिस्लाव गेटजवळ होता. स्फोटानंतर तो बाकी लोकांसोबत बेसमेंटमध्ये गेला. १० मिनिटांनी त्या इमारतीला आग लागल्याचं कळालं. तो पूर्णपणे अडकला होता. मोठ्या संख्येने लोकं जखमी झाले होते. अनेक ठिकाणी रक्त सांडले होते. तेव्हा एक आई ढिगाऱ्याखाली तिच्या मुलाला शोधत होती. ५ वर्षाचा मुलगा जोरजोरात ओरडत होता, मला मरायचं नाही. हे दृश्य ह्रदयद्रावक होते. या मुलाला बाहेर काढण्यात यश आले.
युद्ध पेटलं, मारियुपोल हादरलं
रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला असून युद्धाला आता जवळपास महिना पूर्ण होत आहे. रशियाच्या लष्कराकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाने आता युक्रेनच्या मारियुपोल शहरावर फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन सेनेकडून या शहरात रशियन लष्कर असलेल्या ठिकाणांवर टँकच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.