अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य पाठवले तर...व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:32 PM2024-03-13T17:32:54+5:302024-03-13T17:35:07+5:30
Russia Ukraine War: गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे.
Russia Ukraine War: गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. सुरुवातीला रशियाने युक्रेनवर वर्चस्व मिळवले होत्, पण नंतर युक्रेनने पाश्चिमात्य देशांच्या मदतीने रशियावर पलटवार करण्यास सुरुवात केली. युक्रेन सातत्याने रशियाच्या लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ले करत आहे. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठा इशारा दिला आहे. व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाच्या सार्वभौमत्वाला किंवा स्वातंत्र्याला धोका निर्माण झाल्यास, ते अण्वस्त्रांचा वापर करायला मागे-पुढे पाहणार नाहीत.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना पुन्हा एकदा अणुयुद्धाचा इशारा दिला. अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य पाठवणे थांबवले नाही, तर हे युद्ध भडकवणारे कृत्य मानले जाईल. आम्हीदेखील अणुयुद्धासाठी तयार आहे, असा इशारा पुतिन यांनी दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या या वक्तव्यामुळे युक्रेन आणि अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना पुतिन म्हणाले की, 'आगामी सहा वर्षांसाठी आम्ही सत्तेत असणार आहोत. सध्या युक्रेनमध्ये अण्वस्त्रे वापरण्याची गरज वाटत नाही, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीसाटी तयार आहोत. अमेरिकेने रशियाच्या भूभागावर किंवा युक्रेनवर सैन्य तैनात केले, तर रशिया कारावाई करेल', असा स्पष्ट इशारा पुतीन यांनी दिला. येत्या 15-17 मार्चदरम्यान रशियात सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा पुतिन यांचा विजय निश्चित मानला जातोय.
दोन वर्षांपासून युद्ध सुरू
गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाने युक्रेनचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. युद्धामुळे रशियाचेही मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण युद्धात दोन्ही बाजुचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. एकीकडे बलाढ्य रशिया माघार घ्यायला तयार नाही, तर दुसरीकडे युक्रेनला अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांकडून लष्करी आणि आर्थिक मदत मिळत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे युद्ध सुरू असून, यामुळे दोन्ही देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत.