न्यूयॉर्क – गेल्या २ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियानं यूक्रेनवर आक्रमक हल्ला केला असून राजधानी कीववर कब्जा मिळवण्याचा रशियाचा मानस आहे. सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. जीव वाचवण्यासाठी लोकं बंकचा आधार घेत आहे. अमेरिका, ब्रिटनसह NATO नं रशियाचा हल्ल्याचा निषेध केला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत शुक्रवारी रशियानं यूक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी रशियानं प्रस्तावावर व्हिटो पॉवर वापरली. सुरक्षा परिषदेत ५ स्थायी सदस्यांमध्ये रशियाचा समावेश आहे. तर भारत, चीन आणि यूएईनं हल्ल्याचा निषेध करत मतदानात भाग घेण्याची भूमिका घेतली नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यूक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. त्यात १५ पैकी ११ देशांनी मतदान केले. तर रशियाने प्रस्तावाविरोधात व्हिटो पॉवरचा वापर केला.
रशिया संयुक्त राष्ट्र परिषदेत व्हिटो पॉवरचा वापर करणार हे आधीपासून माहिती होतं. तर भारत, चीन आणि यूएई यांनी मतदानात भाग घेतला नाही. तर त्याच वेळी, पाश्चात्य देशांनी सांगितले की, हा प्रस्ताव म्हणजे युक्रेनविरुद्ध आक्रमकता आणि कारवाईसाठी रशियाला जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे.
यूक्रेनमधील घडामोडींनी भारत अस्वस्थ – टी.एस तिरुमुर्ती
सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधी टी.एस तिरुमुर्ती यांनी सांगितले की, यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे भारत अस्वस्थ आहे. हिंसा आणि शूत्रत्व तात्काळ संपवायला सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत काही तोडगा निघाला नाही. आम्ही भारतीयांच्या सुरक्षेसाठी चिंतेत आहोत. यूक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुत्सद्देगिरीचा मार्ग सोडला गेला हे खेदजनक आहे. आपल्याला त्याकडे परत यावे लागेल. या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे असं त्यांनी सांगितले.
‘या’ देशांनी रशियाच्या विरोधात केले मतदान
रशिया हा भारताचा सर्वात जुना भागीदार आहे. त्यामुळे सर्वांची नजर भारतावर होती. रशियाच्या विरोधात भारत मतदान करणार की नाही याची चर्चा सुरु होती. परंतु भारतानं रशियाविरोधात आलेल्या प्रस्तावावर मतदानात भाग घेण्यास नकार दिला. तर रशियाच्या विरोधात प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, अल्बानिया, ब्राझील, गेबॉन, घाना, आयरलँड, केनिया, मॅक्सिको आणि नॉर्वे देश पुढे आले.