गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचे दिसत आहे. या युद्धामुळे अमेरिकेसारखे बलाढ्य पाश्चात्य देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. त्यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, पाश्चात्य देशांनाही या निर्बंधांचा मोठा फटका बसत आहे. यातच, भारताने मोठा खेला केला आहे. सध्या भारत अमेरिकेला व्हॅक्यूम गॅस ऑइल (VGO) निर्यात करत आहे. महत्वाचे म्हणजे, हे व्हॅक्यूम गॅस ऑइल भारताने रशियाकडून स्वस्त दरात खरेदी केले असून, ते अमेरिकेला महागड्या दरात विकत आहे. यातून नफाही मिळत आहे.
पाश्चात्य देशांना युद्ध काळात रशियाची पुरवठाव्यवस्था बलण्यासाठी पर्याय हवा असल्याचे बोलले जाते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, अमेरिका आणि कॅनडाने रशियन तेल आयातीवर निर्बंध लादले होते. रशियन कच्च्या तेलाच्या उत्पादनांच्या आयातीवर युरोपीयन संघाचे निर्बंध अनुक्रमे 5 डिसेंबर आणि 5 फेब्रुवारीला लागू होतील.
रशियाकडून विकत घेत अमेरिकेला तेल विकतोय भारत -भारत हा तेलाची आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. सध्या भारत रशियाकडून पूर्वीच्यातुलनेत अधिक प्रमाणावर तेलाची खरेदी करत आहे आणि ते अधिक मार्जिनने पाश्चात्य देशांना एक्सपोर्ट करत आहे. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार, जागतील तेल व्यापारी, विटोल आणि ट्रॅफिगुरा यांनी भारतीय रिफायनर नायरा एनर्जीकडून व्हीजीओचे एक-एक कार्गो खरेदी केले आहे. जे 10 डॉलर ते 15 डॉलर प्रति बॅरलदरम्यान आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दराने डिसेंबर महिन्यात भारताच्या वाडिनार बंदरवरून लोड होणारे कार्गो अमेरिका अथवा युरोपात जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी, अफ्रामॅक्स टँकर शांघाई डॉनने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जामनगर बंदरावरून किमान 80,000 टन व्हीजीओ लोड केले, जे ऑक्टोबरच्या अखेरीस ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत अमेरिकेला पोहोचले.