Russia Ukraine War Impact on India: रशिया - युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारताला बसला आहे. भारताला हवी असलेली पाणबुडी आता तब्बल ३ वर्ष उशिराने मिळणार आहे. भारताने रशियाकडून अकुला-श्रेणीच्या आण्विक पाणबुड्या भाड्याने देण्यासाठी ३ अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली होती. हा करार २०१९ मध्ये झाला होता आणि ही पाणबुडी २०२५ मध्ये दिली जाणार होती. मात्र युक्रेनसोबतच्या युद्धामुळे २०२५ पर्यंत ही पाणबुडी भारताला देण्यास रशिया असमर्थ असून आता २०२८ मध्ये ही पाणबुडी देण्याचे आश्वासन दिले होते.
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार भारताने रशियाला सांगितले की त्यांनी २०२७ पर्यंत अकुला श्रेणीची पाणबुडी द्यावी लागेल. हिंदी महासागरात चीनची वाढती घुसखोरी पाहता भारताला शक्य तितक्या लवकर आपला आण्विक पाणबुडीचा ताफा मजबूत करायचा आहे. त्यामुळे रशियाने लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
भाडेकरारावर मिळणार पाणबुडी
भारतीय नौदल ही पाणबुडी खरेदी करत नसून रशियन आण्विक पाणबुडीबाबत भारताचा भाडेकरार झाला आहे. या डीलमध्ये भारतीय कम्युनिकेशन्स, सेन्सर सिस्टीम, त्यांच्या ऑपरेशनसाठी स्पेअर सपोर्ट आणि ट्रेनिंग याचाही समावेश आहे. भारताने यापूर्वी रशियाकडून एक अकुला-श्रेणीची पाणबुडी भाड्याने घेतली होती, ज्याचे नाव INS चक्र II होते. ही पाणबुडी २०१२ मध्ये भारतीय ताफ्यात सामील झाली होती. याशिवाय आयएनएस चक्र-१ देखील रशियाकडून तीन वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आले होते. याशिवाय भारतीय नौदल स्वदेशी बनावटीची, अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी INS अरिहंत आणि अलीकडेच समाविष्ट करण्यात आलेली अरिघाट देखील चालवते.
नौदलाची ताकद वाढणार
भारत सरकारच्या CCSने, म्हणजे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीनेही दोन स्वदेशी आण्विक पाणबुड्या तयार करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे भारतीय नौदलाची सामरिक आणि आक्षेपार्ह क्षमता वाढेल. या पाणबुड्यांच्या बांधणीमुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात नौदलाची ताकद वाढणार आहे. या पाणबुड्या विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये तयार केल्या जातील. या पाणबुड्या ९५ टक्के स्वदेशी असतील. या अरिहंत क्लासपेक्षा वेगळ्या असतील आणि प्रोजेक्ट ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वेसल अंतर्गत तयार केले जातील. त्यानंतर आणखी चार आण्विक पाणबुड्या तयार करण्याची योजना आहे. यासोबतच पुढील वर्षापर्यंत भारतीय नौदलाला अनेक युद्धनौका मिळणार आहेत.