वॉश्गिंटन – रशिया-यूक्रेन युद्धाला(Russia-Ukraine War) २१ दिवस उलटले असून अद्याप या लढाईत निर्णायक निकाल लागला नाही. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह(America) नाटो देशांनी रशियावर कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे रशियाला मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यातच रशियानं स्वस्त दरात कच्चे तेल(Crude Oil) खरेदी करण्याची ऑफर भारताला दिली आहे. त्यामुळे भारत-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत.
अमेरिकेने म्हटलं आहे की, रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून भारत अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणार नाही. त्याचसोबत भारतानं हा व्यवहार केल्यास जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या इतिहासातील हा चुकीचा निर्णय ठरेल. जगभरात तेलाचे दर गगनाला भिडले असताना जर्मनीसह अनेक युरोपीय देश आजही रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करत आहेत अशावेळी अमेरिकेने भारताला इशारा दिला आहे.
भारत रशियाकडून स्वस्त तेल आणि अन्य सामान डिस्काउंटवर खरेदी करण्याचा विचार करतंय. अमेरिकेने रशियाकडून होणारे सर्व आयात थांबवले आहे. ज्यो बायडन प्रशासनाने जगातील सर्व देशांना कळवलं आहे की, अमरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधाचे पालन करावं असं राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते जेन पास्की यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार या प्रश्नावर उत्तर देताना पास्की यांनी भारत अमेरिकेच्या निर्बंधाचे उल्लंघन करणार नाही असं आम्हाला वाटतं. परंतु भारत कुणाच्या बाजूने उभा आहे याचा विचार करावा लागेल असं त्यांनी सांगितले.
पास्की यांनी म्हटलं आहे की, जेव्हा इतिहासाच्या पुस्तकात या युद्धाबद्दल लिहिलं जात आहे. रशियाचं समर्थन करणं म्हणजे या हल्ल्याचं समर्थन करण्यासारखं आहे. भारताने आतापर्यंत यूक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला नाही. इतकेच नाही भारताने रशियाविरोधात संयुक्त राष्ट्र परिषदेत मतदानावेळी गैरहजर राहिला. भारताने रशियासोबत जितकं शक्य आहे तितकं दूर राहावं असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यात रशियाचे उपपंतप्रधान अलेक्जेंडर नोवाक यांनी भारतीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना सांगितले की, रशिया भारताला तेल निर्यात वाढवू इच्छितं. भारताने रशियाच्या तेल प्रकल्पात गुंतवणूक करावी अशीही रशियाची इच्छा आहे असं ते म्हणाले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतातील सर्वात मोठी तेल रिफाइनरी कंपनी इंडियन ऑयलनं २४ फेब्रुवारीला यूक्रेनवर हल्ल्यानंतर पहिल्यांदाच ३० लाख बॅरेल तेल रशियाकडून खरेदी केले. भारताला देशातील गरज भागवण्यासाठी ८० टक्के तेल परदेशातून आयात करावं लागतं. त्यातील केवळ २-३ टक्के तेल रशियाकडून आयात होते. मात्र निर्बंधामुळे रशियानं भारताला तेलाच्या खरेदी मोठी ऑफर दिली आहे. यूरोपीय देश अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करत आहेत.