किव्ह - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. आपल्यापासून हाजारो मैल दूर सुरू असलेल्या या युद्धाच्या भीषण, क्रूर, करुण आणि शौर्याने भारलेल्या अनेक कहाण्या आपल्यापर्यंत विविध माध्यमातून पोहोचत आहेत. त्यातच हजारो भारतीयविद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यातीत अनेक जण मायदेशात परतण्यासाठी धडपडत आहेत. मात्र आता अशा एका भारतीय तरुणीची कहाणी समोर आली आहे जिने युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतण्यास नकार दिला आहे. तिच्या मायदेशी परतण्याला नकार देण्यामागचं कारण समजल्यावर तुम्ही तिचं कौतुक केल्यावाचून राहणार नाही.
ही भारतीय विद्यार्थिनी युक्रेनमधील एका घरात भाड्याने राहते. सध्या तिथे सुरू असलेल्या युद्धाच्या धामधुमीत त्या घराच्या घरमालकाने देशाच्या रक्षणासाठी युक्रेनच्या सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र ते त्यांच्यामागे पत्नी आणि तीन मुलं, असं कुटुंब सोडून युद्धाच्या आघाडीवर गेले आहेत. त्यामुळे या भारतीय विद्यार्थिनीने तिच्या घरमालकाच्या कुटुंबाची देखरेख करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हरियाणातील चरखी दादरी येथील एका शिक्षिकेने सांगितले की, भारतातील मेडिकल स्टुडंट असलेल्या नेहाने तिच्या आईला निरोप पाठवला आहे. त्यात तिने सांगितले आहे की, मी जिवंत राहीन अथवा राहणार नाही. मात्र मी या मुलांना आणि त्यांच्या आईला सोडून येणार नाही. नेहाने तिच्या मित्राला सांगितले की, आम्हाला येथे सातत्याने बाहेर स्फोटांचा आवाज ऐकू येत आहे. मात्र आतापर्यंत आम्ही सुखरूप आहोत.
नेहा एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी किव्ह येथे गेली होती. हॉस्टेल न मिळाल्याने तिने एका इंजिनियरच्या घरात खोली भाड्याने घेतली होती. नेहाच्या आईची मैत्रिण सविता जाखर यांनी सांगितले की, नेहा घरमालकांच्या मुलांसोबत रुळली आहे. देशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिला देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. तिच्या आईनेही तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तिने परत येण्यास नकार दिला.