Russia-Ukraine War: यूक्रेनच्या सैन्यात भरती झाला भारतीय विद्यार्थी; आर्मीत नोकरी करण्याचं होतं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:18 PM2022-03-08T12:18:28+5:302022-03-08T12:19:05+5:30
आता या युद्धात रशियाविरोधात लढण्यासाठी एका भारतीय विद्यार्थ्याने यूक्रेनच्या सैन्यात प्रवेश घेतला आहे.
कीव्ह – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाला १३ दिवस झाले तरीही अद्याप हे युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. सुरुवातीला एकतर्फी लढाई वाटणाऱ्या या युद्धात बलाढ्य रशियालाही यूक्रेनच्या कडवट प्रतिहल्ल्यानं आव्हान दिलं आहे. कमी सैन्यबळ असून यूक्रेन रशियासमोर संकट उभं करत आहे. कारण यूक्रेनचे सर्वसामान्य नागरिकही या लढ्यात उतरले आहेत. या संकटकाळात यूक्रेननं सक्तीची सैन्यभरती सुरू केली आहे. त्यात अनेक लोकं भरती होत आहेत.
आता या युद्धात रशियाविरोधात लढण्यासाठी एका भारतीय विद्यार्थ्याने यूक्रेनच्या सैन्यात प्रवेश घेतला आहे. यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या युवकानं सैन्यात भरती होण्याचं ठरवलं आहे. रशियाविरोधाच्या युद्धात हा भारतीय विद्यार्थी आता यूक्रेन सैन्याकडून लढत आहे. एकीकडे भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा हाती घेतलं आहे. त्यात अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात यश आलं आहे. अशावेळी एका भारतीय विद्यार्थ्याने यूक्रेनच्या सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. हा विद्यार्थी कोण आहे आणि कुठे राहतो? त्याच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेऊया.
कोण आहे हा भारतीय विद्यार्थी?
इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, जो भारतीय विद्यार्थी यूक्रेनच्या सैन्यात भरती झाला आहे त्याचं नाव सैनीकेश रविचंद्रन असं आहे. तो २१ वर्षाचा आहे. रविचंद्रन तामिळनाडूच्या कोयंम्बटूर येथे राहणारा आहे. त्याने यूक्रेनमध्ये पॅरामिलिट्री फोर्स ज्वाईन केली आहे. काही अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी जाऊन याबाबत माहिती दिली. रविचंद्रन याला सुरुवातीपासून सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं. याआधी त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु काही कारणास्तव त्याची निवड झाली नाही.
त्यानंतर २०१८ मध्ये रविचंद्रन यूक्रेनमध्ये गेला. त्याठिकाणी नॅशनल एरोस्पेस यूनिवर्सिटी शिक्षण घेण्यासाठी गेला. तो यूक्रेनच्या खारकीव्ह येथील यूनिवर्सिटीत होता. यावर्षी जुलै महिन्यात त्याचं शिक्षण पूर्ण होणार होतं. परंतु युद्धामुळे त्याच्या शिक्षणात बाधा आली आणि आता तो यूक्रेनच्या सैन्यात भरती होऊन रशियाविरोधात युद्ध लढत आहे. युद्धामुळे रविचंद्रनचं कुटुबीयांसोबत संपर्क तुटला. भारतीय दूतावास सैनीकेश रविचंद्रनशी संपर्कात होते. परंतु त्याने घेतलेल्या निर्णयामुळे तो भारतात परतण्यास तयार नसल्याचं दिसून येते.