रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. दरम्यान, युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी बायरक्तार टीबी2 ड्रोनच्या माध्यमातून रशियाचे 100 टँक आणि 20 लष्करी वाहने नष्ट केली. दरम्यान, रशियाची काही विमाने, हेलिकॉप्टर्स आणि रॉकेट लाँचर्स नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेलेत किंवा जखमी झाले आहे, असेही युक्रेनने म्हटले आहे. याच दरम्यान युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अद्यपही अडकून पडले आहेत.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. कीवमधील भारतीय दुतावासाने कीव रेल्वे स्टेशनवर विद्यार्थ्यांनी पोहोचावं, अशी सूचना केली होती. यानुसार शेकडो विद्यार्थी कीव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. पण आता तेथील भयावह परिस्थितीही समोर आली आहे. सध्या कीवमधील दोन वैद्यकीय महाविद्यालयातील 350 विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर आहेत. पश्चिम युक्रेनमधील ल्वीव किंवा उज्ह्रोहोद जाण्यासाठी ट्रेन पकडण्याची वाट पाहत आहेत. मात्र, त्यांना ट्रेनमध्ये चढू दिले जात नसल्याचे म्हणणं आहे. जे ट्रेनमध्ये चढत आहेत त्यांच्यावर लाठीमार करून बाहेर फेकले जात आहे, असे एका विद्यार्थिनीने म्हटलं आहे.
"आम्हाला युक्रेनमधून बाहेर काढले जात आहे"
आम्हाला ल्वीव किंवा उज्ह्रोहोद येथे जाण्यास सांगितले होते. यामुळे तारास शेवचेंको नॅशनल युनिव्हर्सिटी आणि बोगोमोलेट्स नॅशनल एम युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी कीव स्टेशनवर आले आहेत, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. भारतीय विद्यार्थिनी राधिका लक्ष्मीने तेथील भयानक स्थितीची माहिती दिली. "आम्हाला युक्रेनमधून बाहेर काढले जात आहे, म्हणून आम्ही सर्व कीव रेल्वे स्टेशनवर आलो. पण आम्हाला ट्रेनमधून बाहेर फेकले जात आहे. ट्रेनच्या आत जाऊ दिलं जात नाही. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. इतर वस्तुंनीही हल्ले केले जात आहेत. येथे शेकडो विद्यार्थी आहेत. आम्ही सर्व इथे अडकलो आहोत. कृपया लवकर काहीतरी करा" असं राधिकाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'फक्त ब्रेडचा तुकडा उरलाय, हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला'
भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार देखील पावलं उचलत आहेत. याच दरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याने मदतीसाठी साद घातली आहे. "ब्रेडचा एक तुकडा उरलाय, बंकरमध्ये हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला" असं त्याने म्हटलं आहे. असोयुन हुसैन असं या भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. बंकरमध्ये अडकून राहिलेल्यांची नेमकी कशी परिस्थिती आहे याची त्याने माहिती दिली आहे. एका न्यूज एजन्सीसोबत फोनवर चर्चा करताना हुसैन याने "युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जेवण आणि औषधं मिळणं अत्यंत कठीण झालं आहे कारण येथे स्थानिक लोकांना प्राथमिकता दिली जात आहे" असं म्हटलं आहे.