हेग: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता २२ दिवस झाले आहेत. या काळात युक्रेनच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिवीतहानी देखील झाली आहे. परंतू त्यापेक्षा जास्त नुकसान रशियाचे झाले आहे. एकीकडे अवघे जग विरोधात असताना पाकिस्तान, चीन यांनी उघड भूमिका घेत रशियाला पाठिंबा दिला होता. तर भारताने मूक संमती दिली होती. युएनमध्ये दोनदा रशियाविरोधातील मतदानावेळी भारत गैरहजर राहिला होता. परंतू, बुधवारी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाविरोधात मतदान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
युक्रेनने रशियाने केलेल्या हल्ल्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यावर न्यायालयाने रशियाला तातडीने युद्ध रोखण्याचे आदेश दिले आहेत. हा युक्रेनचा विजय असल्याचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी म्हटले आहे. असे असले तरी रशियाने चर्चा आणि हल्ले सुरुच ठेवले आहेत.
न्यायालयात जेव्हा यावर सुनावणी झाली, त्यानंतर झालेल्या मतदानात भारताचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांनी रशियाविरोधात मतदान केले. रशियाविरोधात १३-२ असे मतदान झाले. या १३ मतांमध्ये भारताचे मत देखील होते. भारत सरकारच्या भूमिकेच्या उलट भंडारी यांनी मतदान केल्याने मोठा धक्का मानला जात आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या बाजूने मतदान करणारे दोन न्यायाधीश रशिया आणि चीनचे होते. भारत सरकारच्या सहकार्यानंतर दलवीर भंडारी आयसीजेचे न्यायाधीश बनले आहेत. रशिया-युक्रेन मुद्द्यावर त्यांचा दृष्टिकोन भारत सरकारच्या अगदी विरुद्ध आहे. रशियासोबतचे संबंध आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे भारताने यूएनमध्ये रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर मतदान करण्यापासून स्वतःला दूर ठेवले होते.
रशियाने आदेशाचे पालन केले नाही तर?ICJ चा हा निर्णय रशियाला मान्य होणार नाही, असे विश्लेषकांचे मत आहे. जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आहे.