Russia Ukraine War: शत्रूचे ४० सैनिक ठार करणारी जखमी ‘बगिरा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:39 AM2022-04-04T05:39:57+5:302022-04-04T05:40:29+5:30
Russia Ukraine War: रशियाच्या लष्करात मात्र महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या महिलांनी प्रत्यक्ष समरांगणातही शत्रूशी समोरासमोर दोन हात करताना ‘शत्रूपक्षाच्या’ अनेक सैनिकांना घायाळ आणि ठार केलं आहे. त्यातलं एक नाव आहे इरिना स्टारिकोवा.
युद्धात शत्रूच्या समोरासमोर, त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवीत आणि अरेला कारे करीत मोठ्या त्वेषानं शत्रूवर चाल करून जात त्यांचा खात्मा करणाऱ्या महिला सैनिक जगभरात तशा कमीच आहेत. कारण अजूनही अनेक देशांत लष्करात महिला भरतीला बंदी आहे. काही ठिकाणी अशी भरती केली गेली असली तरी महत्त्वाच्या पदांवर आणि प्रत्यक्ष समरांगणात त्यांची नियुक्ती केली जात नाही, त्यांना प्रत्यक्ष लढाईसाठी पाठवलं जात नाही. काही देश मात्र त्याला अपवाद आहेत. त्यातलाच एक देश आहे रशिया.
सध्या युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धातही अनेक रशियन महिला सामील आहेत. रशियानं युक्रेनवर केलेलं आक्रमण चुकीचं, दादागिरीचं असलं, जगभरातून रशियाचा निषेध होत असला, तरी त्यांच्या लष्करात मात्र महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या महिलांनी प्रत्यक्ष समरांगणातही शत्रूशी समोरासमोर दोन हात करताना ‘शत्रूपक्षाच्या’ अनेक सैनिकांना घायाळ आणि ठार केलं आहे. त्यातलं एक नाव आहे इरिना स्टारिकोवा. शार्प शूटर असलेली इरिना युक्रेनसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ‘वॉण्टेड’ असली तरी ती त्यांच्या हाती लागली नव्हती. आताही प्रत्यक्ष युक्रेनमध्ये शिरून चाळीस युक्रेनी सैनिकांना तिनं यमसदनी पाठविलं. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत, जिवंतपणी युक्रेनी सैनिकांच्या ताब्यात ती सापडल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला आहे.
आघाडीची सैनिक असल्यानं या ‘शेरणी’ला प्रत्यक्ष नावानं पुकारलं जात नाही. तिचं कोडनेम आहे ‘बगिरा’. युक्रेनच्या अंतर्गत भागात शिरून युक्रेनच्या सैनिकांशी ती लढत होती. या लढाईत ती गंभीर जखमी झाली. ती आता जगणार नाही, असं समजून रशियन सैनिकही तिला तशाच गंभीर जखमी अवस्थेत सोडून निघून गेले; पण नंतर युक्रेनच्या सैनिकांनी तिला इस्पितळात दाखल केलं आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्याबाबतीत ‘एक रशियन महिला सैनिक’ एवढंच फक्त युक्रेनच्या सैनिकांना माहीत होतं, पण तिची चौकशी केल्यावर, झडती घेतल्यावर, तिचं सामान आणि गोपनीय कागदपत्रं तपासल्यावर त्यांना लक्षात आलं, ही साधीसुधी रशियन महिला सैनिक नसून खतरनाक शार्प शूटर इरिना स्टारिकोवा आहे. कारण २०१४ पासून युक्रेनला ती हवी होती. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वीही युक्रेनमधील फुटीरवाद्यांना हाताशी धरून ती युक्रेनी सैनिकांना ‘सळो की पळो’ करीत होती. तेव्हा आणि आताही अनेक सैनिक आणि निरपराध नागरिकांना तिनं आपल्या बंदुकीचा निशाणा बनविलं असा तिच्यावर आरोप आहे. माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार रशियन सैन्यात दाखल होण्याआधी इरिना नन होती. तिला दोन मुलीही आहेत. पतीशी तिचा घटस्फोट झाला आहे. मूळची ती सर्बियाची आहे. इरिनाला पकडल्यानंतर ‘आम्हाला हवी होती, तीच ही इरिना’ असं म्हणत युक्रेननं तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
इतर कोणत्याही देशांत महिला सैनिकांची संख्या कमी प्रमाणात दिसत असली, तरी रशिया मात्र त्याला अपवाद आहे आणि अगदी दुसऱ्या महायुद्धातही सोव्हिएत रशियानं आपल्या लष्कराच्या ताफ्यात महिला सैनिकांची भरती केली होती. त्यातल्या बहुसंख्य महिला सैनिक ‘शार्प शूटर’ म्हणून ओळखल्या जात होत्या. समरांगणात महिलांना नेहमी कमी समजलं जातं, पण हा समज रशियन महिला सैनिकांनी अनेकदा खोटा ठरविला आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियन महिला सैनिक ल्यूडमिला पावलिचेंको हिने गाजवलेला पराक्रमही रशियन सैनिक आणि जनतेसाठी मोठा गौरवशाली समजला जातो. तिनं एकटीनं शत्रूपक्षाच्या तब्बल ३०९ सैनिकांना धारातीर्थी पाडलं होतं. त्यामुळे ल्यूडमिला हिला ‘लेडी डेथ’ अशी उपाधी देण्यात आली होती. याच युद्धात गंभीर जखमी झाल्यामुळे नंतर ‘सक्रिय’ युद्धातून तिला निवृत्ती घ्यावी लागली होती.
१९४१ मध्ये हिटलरनं सोव्हिएत रशियावर हल्ला केला होता. त्यावेळी केवळ १७ वर्षांच्या शार्प शूटर येलिजावेटा मिरोनोवा हिनं एकटीनं तब्बल शंभरपेक्षा जास्त नाझी सैनिकांना नेस्तनाबूत केलं होतं. मॉस्कोमध्ये जन्मलेल्या मिरोनोवानं त्यावेळी नुकतंच आपलं शालेय शिक्षण संपवलं होतं आणि युद्धामुळे रेड आर्मीमध्ये ती दाखल झाली होती. विशेषत: गोरियाची क्लूच येथे जी समोरासमोरची घनघोर लढाई झाली होती, त्यात मिरोनोवानं असामान्य धैर्य आणि पराक्रम दाखवताना वीस जर्मन सैनिकांना ठार मारलं होतं; पण नोवोरोसिस्कच्या लढाईत ती गंभीर जखमी झाली आणि अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तिला वीरमरण आलं..